कचरा वाहतुकीचे ३७ कोटींचे काम नेले ७४ कोटींवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:15 AM2021-08-24T04:15:57+5:302021-08-24T04:15:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : परिमंडळ एकमधील कचरा गोळा करण्याचे जे काम महापालिकेला ३७ कोटी रुपयांमध्ये शक्य आहे, तेच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : परिमंडळ एकमधील कचरा गोळा करण्याचे जे काम महापालिकेला ३७ कोटी रुपयांमध्ये शक्य आहे, तेच काम ठेकेदारामार्फत करण्यात यावे व त्यासाठी ७४ कोटी रुपये खर्चाचे पूर्वगणन पत्रक (एस्टीमेट) तयार करण्याचा घाट मोटर वाहन विभागाने घातल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.
मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. यावेळी मनसेचे गटनेते साईनाथ बाबर, प्रवक्ते योगेश खैरे आदी उपस्थित होते.
संभूस म्हणाले की, महापालिकेच्या एका परिमंडळमधील (झोन) कचरा गोळा करण्यासाठी ४२ घंटागाड्या आणि कॉम्पॅक्टर सात वर्षासाठी भाडेतत्त्वावर घेण्यासाठी नियोजन (एस्टीमेट) केले आहे. यात भाडेतत्त्वावर घेतलेल्या गाड्यांचा खर्च, ड्रायव्हर व बिगाऱ्यांचा पगार मिळून ७४ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. मात्र, महापालिकेने स्वत:च कचरा वाहनखरेदी केल्यास व स्वत:चे कर्मचारी नियुक्त केल्यास हा खर्च ३७ कोटी रुपये येणार आहे. त्यातच आता समाविष्ट गावांसह महापालिकेचे ७ झोन तयार होणार असून, ७ वर्षांसाठी ही वाहने भाडेतत्त्वावर घेतल्यास महापालिकेचे सुमारे २६० कोटी रुपये अधिकचे खर्च होणार आहे. त्यामुळे महापालिकेने ठेकेदाराचे कल्याण करण्यापेक्षा, थेट वाहने खरेदी करून पुणेकरांचे पैसे वाचवावेत. या पूर्वगणन पत्रकास आयुक्तांनीही मान्यता देऊ नये, अन्यथा मनसे आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला.