मिळकतकर थकविला ३७ शिक्षण संस्थांनी
By admin | Published: May 23, 2017 05:12 AM2017-05-23T05:12:28+5:302017-05-23T05:12:28+5:30
पिंपरी-चिंचवड शहरातील दहा लाखांपेक्षा जास्त मिळकत कराची थकबाकी असलेल्या ३७ शैक्षणिक संस्थांवर
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील दहा लाखांपेक्षा जास्त मिळकत कराची थकबाकी असलेल्या ३७ शैक्षणिक संस्थांवर महापालिकेच्या करसंकलन विभागातर्फे बुधवारपासून जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील साठ मोठ्या थकबाकीदारांच्या मिळकतींवर गेल्या वर्षी जप्तीची कारवाई करून मिळकतकराची वसुली केली होती. तसेच धोरण पुन्हा मिळकतकर विभागातर्फे राबविण्यात येणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील मोठ्या थकबाकीदारांमध्ये काही शैक्षणिक संस्थांचाही समावेश आहे.
फेब्रुवारी, मार्चमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा कालावधी, तसेच शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया न जाण्याच्या दृष्टीने महापालिकेमार्फत शैक्षणिक संस्थांवर जप्तीची कारवाई केली नाही. थकबाकी असलेल्या शैक्षणिक संस्थांच्या मिळकतींवर जप्तीची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. शंभर टक्के करवसुली करा, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे करसंकलन विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर शिक्षण संस्था कार्यरत आहेत. मार्चअखेर रुपये एक लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या एकशे तीन शैक्षणिक संस्था आहेत. यामध्ये पन्नास लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या पाच मोठ्या शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. थकबाकी असलेल्या एकशे तीन शैक्षणिक संस्थांपैकी सध्या दहा लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ३७ शैक्षणिक संस्थांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.