शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी ३७ लाखांचा खर्च; पुणे महापालिकेच्यावतीने पहिल्यांदाच स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 12:25 PM2018-01-09T12:25:55+5:302018-01-09T12:28:26+5:30
महापालिकेच्या वतीने महापौर चषक स्पर्धेअतंर्गत यंदा पहिल्यांदाच शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजिण्यात आली. परंतू या खर्चाला मान्यता घेण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवत सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत आयत्या वेळी प्रस्ताव दाखल केला.
पुणे : महापालिकेच्या वतीने महापौर चषक स्पर्धेअतंर्गत यंदा पहिल्यांदाच शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजिण्यात आली. यासाठी तब्बल ३७ लाख ५३ हजार रुपयांचा निधी खर्च केला. परंतू या खर्चाला मान्यता घेण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवत सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत आयत्या वेळी प्रस्ताव दाखल केला.
महापौर चषक स्पर्धेअंतर्गत दर वर्षी शहरात विविध स्पर्धा घेतल्या जातात. महापौर चषक स्पर्धांसाठी केल्या जाणाऱ्या खर्चावरून अनेकदा वादंगही निर्माण होतात. पालिकेत सत्ताधारी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) पदाधिकाऱ्यांनी यंदा याबाबत काहीही वाद निर्माण होणार नसल्याची ग्वाही दिली. मुक्ता टिळक, मुरलीधर मोहोळ यांनी गेल्या आठवड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा दावा केला होता. यंदाच्या वर्षी महापौर चषक स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच शरीरसौष्ठव स्पर्धेचा समावेश करण्यात आला होता. पालिकेच्या वतीने पहिल्यांदाच ही स्पर्धा घेतली जात असल्याने पालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी याचे आयोजन आपल्याकडे घेतले होते. या स्पर्धेसाठी होणाऱ्या खर्चाची माहिती जिल्हा संघटनेने १४ सप्टेंबरलाच पालिकेला दिली होती. तसेच ही स्पर्धा घेण्याबाबत महापौर कार्यालयाने २० डिसेंबरलाच पत्र दिलेले होते.
महापालिका : आयत्यावेळी प्रस्ताव दाखल करून मान्यता
महापौर चषक स्पर्धा घेण्याचे जाहीर झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच शरीरसौष्ठव स्पर्धेला झुकते माप दिले होते. महापौर चषक स्पर्धांमध्ये कोणत्या खेळांचा समावेश असणार आहे, याची माहिती देण्यासाठी महापौर टिळक यांनी पालिकेत पत्रकार परिषद बोलाविण्यापूर्वीच शहरातील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये फक्त शरीरसौष्ठव स्पर्धेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती.