बदल्यासाठी कोयत्याचे ३७ वार केले, चौघांना जन्मठेप; दंडाच्या रकमेपैकी ५ लाख रुपये मृताच्या कुटुंबीयांना
By नम्रता फडणीस | Published: August 24, 2023 04:49 PM2023-08-24T16:49:13+5:302023-08-24T16:49:20+5:30
21 नोव्हेंबरला घुले थेरगाव, काळेवाडी फाटा येथे गाठून तब्बल 37 वार करून, त्यास ठार मारले
पुणे : पूर्वीच्या भांडणाचा बदला घेण्याच्या इराद्याने तरुणावर कोयत्याचे 37 वार करुन त्याला ठार मारल्याप्रकरणी न्यायालयाने चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी 2 लाख रुपयांचा दंड सुनावण्यात आला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.पी जाधव यांनी हा निकाल दिला. दंडाच्या रकमेपैकी 5 लाख रुपये हे मयत तरुणाच्या कुटुंबियांना द्यावेत असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
ही घटना 21 नोव्हेंबर 2010 मध्ये काळेवाडी फाटा येथील हाँटेल येथे रात्री 2 वाजता घडली. यामध्ये राकेश नामदेव घुले (वय 25, रा.बोपखेल) याचा मृत्यू झाला . हैदर जावेद सय्यद (रा.विजयनगर, काळेवाडी), विक्रम उर्फ विक्की नंदू बिहारी उर्फ बिहारे ( रा.आदर्शनगर काळेवाडी), अविनाश गौतम बनसोडे (रा. हिंद केसरीनगर) आणि साजिश अशोक करवत (रा.श्रद्धा कॉलनी ज्योतिबानगर काळेवाडी) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.हे आरोपी सप्टेंबर 2012 पासून 16 फेब्रुवारी 2019 पर्यंत कारागृहात होते.
या प्रकरणात एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यातील एक आरोपीवर गोळीबार झाल्याने तो अंथरुणाला खिळला. त्याची स्वतंत्र सुनावणी घेण्यात येत आहे तर दुसरा आरोपी सुनावणीदरम्यान मृत पावला आणि तिसरा आरोपी हा विधिसंघर्षित मुलगा आहे. त्यामुळे सातपैकी 4 आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी काम पाहिले.
मार्च 2010 मध्ये राकेश घुले याने यातील आरोपींवर बोपखेल येथे वार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. त्याबाबत भोसरी पोलिस ठाण्यात घुले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या भांडणाचा बदला घेण्याच्या इराद्याने आरोपींनी आपसात संगनमत करून 21 नोव्हेंबरला घुले याला थेरगाव, काळेवाडी फाटा येथे गाठून त्याच्या उजव्या हातावर, डोक्यावर, पाठीवर कोयत्याने तब्बल 37 वार करून, त्यास ठार मारले होते. गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या कोयत्यापैकी दोन कोयते गुन्ह्याच्या घटनास्थळी सापडले होते. तर, अन्य तीन कोयते आरोपींकडून जप्त केले होते. तसेच, घुले याच्या जीवघेणा हल्ला केला जात असताना, मयूर चंद्रकांत मेदगे, कैलास हिरामण मोरे, हरिदासम मुरलीधर घुले, अविनाश नामदेव घुले, मंदार ऊर्फ पप्पू एकनाथ देवकर हे घुले सोबत होते. ते प्रत्यक्षदर्शी होते. पोलिसांनी त्यांची साक्ष नोंदवली होती.