३७२ कोटी थकला मिळकतकर; १ हजार ८१६ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 03:10 AM2018-03-20T03:10:15+5:302018-03-20T03:10:15+5:30
मार्चअखेर जवळ आल्याने महापालिकेच्या मिळकतकर विभागाने जास्तीतजास्त कर वसूल करण्यासाठी कंबर कसली आहे. परंतु शहरातील तब्बल १ लाख ६६ हजार ६३५ पुणेकरांनी गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ मिळकत करच भरला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुणे : मार्चअखेर जवळ आल्याने महापालिकेच्या मिळकतकर विभागाने जास्तीतजास्त कर वसूल करण्यासाठी कंबर कसली आहे. परंतु शहरातील तब्बल १ लाख ६६ हजार ६३५ पुणेकरांनी गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ मिळकत करच भरला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या मिळकतकरदात्यांकडे तब्बल
३७२ कोटी ६४ लाख रुपयांची थकबाकी असून, दंडापोटी तब्बल ४ कोटी ६६ लाख रुपये वसूल करण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या वतीने चालू वर्षासाठी मिळकतकरातून तब्बल १ हजार ८१६ कोटी रुपयांचा कर वसूल करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मार्चअखेर जवळ आल्याने जास्तीत जास्त कर वसूल करण्यासाठी मिळकती जप्त करणे, भरारी पथकांची नियुक्ती, थकबाकीदारांच्या घरांसमोर बॅण्ड वाजवणे, नोटीस देणे आदी कडक कारवाई सुरु आहे. तरीदेखील किमान एक हजार कोटींचा टप्पा ओलांडताना प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहे. असे असताना शहरातील लाखो मिळकतदार करच भरत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
महापालिकेचे सदस्य आनंद रिठे यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मिळकतकर विभागाने वरील माहिती दिली आहे. यामध्ये शहरामध्ये २५ हजारांपेक्षा कमी वार्षिक
करपात्र रक्कम असलेल्या ७ लाख ४ हजार ५७८ मिळकती असून,
यापैकी तब्बल १ लाख ६६ हजार
६३५ मिळकतदारांनी गेल्या ३ वर्षांहून जास्त काळ मिळकतकरच भरला नसल्याचे सांगितले आहे. या मिळकतदारांकडे ३७२ कोटी ६४ लाख १२ हजार ४४७ रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये ४ कोटी ६६ लाख रुपयांचा दंड करण्यात आला असल्याचे मिळकतकर विभागाने स्पष्ट केले आहे.
या थकबाकीदारांकडून जास्तीत जास्त कर वसलू करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु न्यायालयीन प्रकरणे, दुबार मिळकती यामुळे अडचणी येत आहेत.
अंदाजपत्रकात प्रथमच १७०० कोटींची तूट
मिळकतकरातून महापालिकेला सन २०१७-१८ मध्ये तब्बल १ हजार ८१६ कोटींचा कर मिळेल असे गृहीत धरण्यात आले. परंतु पहिल्या सहा महिन्यांत ५०० ते ५५० कोटी रुपयेदेखील वसूल झाले नाहीत.
यामुळे महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये यंदा प्रथमच १७०० कोटी रुपयांची तूट निर्माण झाली. यामुळे प्रशासनाचे जास्तीतजास्त कर वसूल करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. परंतु लाखो पुणेकर करच भरत नसतील तर करवसुलीचे उद्दिष्ट कसे पूर्ण होणार, हा मोठा प्रश्नच आहे.