मिलटरी फार्मसची ३८ लाख ८८ हजारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:10 AM2021-04-09T04:10:18+5:302021-04-09T04:10:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मिलटरी फार्मसला अन्नधान्य पुरविण्याचा ठेका घेताना बनावट नूतनीकरण ठेव पावती व फिड पुरवठा करावयाचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मिलटरी फार्मसला अन्नधान्य पुरविण्याचा ठेका घेताना बनावट नूतनीकरण ठेव पावती व फिड पुरवठा करावयाचे हप्ते पावत्या सादर करून दोन ठेकेदारांनी मिलटरी फार्मसची तब्बल ३८ लाख ८८ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी ले. कर्नल अविनाश शर्मा (वय ५०, रा. फार्म हाऊस मिलिटरी, सिकंदराबाद) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, धर्मा देवी (आंध्रा सेल्स कॉर्पोरेशन रा. हैदराबाद) आणि मनोज अगरवाल (बालाजी कॉर्पोरेशन रा. मलाकपेठ, हैदराबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सदर्न कमांड मुख्यालयातील मिलटरी फार्मस येथे २९ जून २०१२, २ जुलै २०१३ आणि २७ जानेवारी २०१४ यावेळी घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलटरी फार्म यांना अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी सदर्न कमांडमधील मिलटरी फार्मस यांनी निविदा काढल्या होत्या. त्यात या दोघांनी भाग घेतला. त्या प्रक्रियेत या दोन्ही फर्मनी ३८ लाख ८८ हजार ५०० रुपयांची नूतनीकरण ठेव पावत्या व फिड पुरवठा करावयाचे हप्ते पावत्या सादर केला. त्यानुसार त्यांना अन्नधान्य पुरवठा करायचा ठेका मिळाला व त्यांनी कामकाज सुरु केले. त्यानंतर या दोन्ही फर्मनी दिलेल्या सुरक्षा ठेव पावत्यांची लेफ्टनंट कर्नल शर्मा यांनी हैदराबाद येथील स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडे शहानिशा केली. तेव्हा बँकेने अशा प्रकारच्या पूर्वी नूतनीकरणाच्या कोणत्याही ठेवी न ठेवण्याबाबतची माहिती दिली.
या दोन्ही संस्थांनी वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी बनावट पावत्या तयार करून त्या खऱ्या असल्याचे भासवून त्या सदर्न कमांड कार्यालयात सादर करुन लष्कराची ३८ लाख ८८ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. कोविड-१९ मुळे तक्रार देण्यास उशीर झाल्याने फिर्यादीत म्हटले आहे.