Pune Crime | रिझर्व्ह बँकेत नोकरीच्या आमिषाने ३८ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 06:45 PM2023-04-20T18:45:00+5:302023-04-20T18:45:01+5:30
हा प्रकार पुणे व नवी मुंबईतील बेलापूर येथे फेब्रुवारी २०२२ ते ऑगस्ट २०२२ दरम्यान घडला....
पुणे : रिझर्व्ह बँकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने ३८ लाख ५० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वडगाव शेरी येथील एका ५२ वर्षांच्या महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सदानंद बाळकृष्ण भोसले (वय ६२, रा. नवी मुंबई) आणि संभाजी विजय पाटील (४१, रा. नाशिक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पुणे व नवी मुंबईतील बेलापूर येथे फेब्रुवारी २०२२ ते ऑगस्ट २०२२ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांचा मुलगा व मुलीस रिझर्व्ह बँक बेलापूरमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील, असे सांगून वेळोवेळी त्यांच्याकडून ३८ लाख ५० हजार रुपये घेतले. त्यानंतरही त्यांच्या मुलगा व मुलीला नोकरीला लावले नाही. त्यांनी पैसे परत मागितले असता ते परत न केल्याने शेवटी आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर आता त्यांनी फिर्याद दिली असून, पोलिस निरीक्षक जानकर तपास करीत आहेत.