भोंदूबाईच्या नादी लावून ३८ लाखांचे सोने लंपास
By admin | Published: February 21, 2017 03:06 AM2017-02-21T03:06:05+5:302017-02-21T03:06:05+5:30
पतीच्या दुसऱ्या विवाहामुळे कुटुंबात होत असलेल्या भांडणाने वैतागलेल्या मालकिणीला भोंदूबाईच्या नादी लावून तिच्या मदतीने
पुणे : पतीच्या दुसऱ्या विवाहामुळे कुटुंबात होत असलेल्या भांडणाने वैतागलेल्या मालकिणीला भोंदूबाईच्या नादी लावून तिच्या मदतीने तब्बल ३८ लाखांचे सोने लंपास करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने भोंदूबाई, दोन मोलकरणी आणि चोरीचे सोने घेणाऱ्या सराफाला अटक केली आहे. पोलिसांनी या तिघींकडून ३४ लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती उपायुक्त पी. आर. पाटील आणि सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी दिली.
अंबिका भगतसिंग मिझाड (वय ३९, रा. आईमाता मंदिराजवळ, बिबवेवाडी), राधिका चक्रधर सोनार (वय ३४, रा. सरगम चाळ, बिबवेवाडी) अशी अटक मोलकरणींची नावे आहेत. तर रेशम्मुनिस्सा रफिक सय्यद (वय ४३, रा. ढोले मळा, सॅलिसबरी पार्क) या भोंदूबाईसह नरेशकुमार किसाराम चौधरी (वय ४०, रा. बिबवेवाडी) यालाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक उत्तमचंद जैन- चोरडिया (रा. श्रावस्ती सोसायटी, सॅलिसबरी पार्क) यांच्या घरामधून ३८ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. जैन यांचा स्वत:चा व्यवसाय आहे.
यासंदर्भात स्वारगेट पोलीस ठाण्यात जैन यांनी फिर्याद दिली होती. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखेकडून सुरू होता. तपासादरम्यान, घरातील कामगारांच्या बोलण्यामध्ये विसंगती येऊ लागल्यामुळे त्यांचा संशय बळावला.
दरम्यान, खबऱ्याने वरिष्ठ निरीक्षक सीताराम मोरे यांना सराफ चौधरी याने या चोरीतील माल विकत घेतल्याची माहिती दिली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता जैन याच्या दोन मोलकरणी आणि भोंदूबाईकडून विकत घेतलेले सोने वितळवून त्याची लगड बनविल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार मोलकरणींसह भोंदूबाईला तपास करण्यात आला. यातील एक मोलकरीण १३ व दुसरी ५ वर्षांपासून त्यांच्याकडे काम करते. ही कारवाई उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ निरीक्षक सीताराम मोरे यांच्या पथकाने
केली. (प्रतिनिधी)
दीपक जैन यांची दोन लग्नं झालेली आहेत. त्यावरून पहिल्या पत्नीसोबत त्यांचे भांडण होत होते. त्यांच्या वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या तणावाचा फायदा घेण्याचे मिझाड आणि सोनार या दोघींनी ठरवले. त्यांनी जैन यांच्या पत्नीची ओळख सय्यद हिच्याशी करून दिली.
सय्यद हिने ती भविष्य सांगत असल्याचे तसेच दैवी उपाय करते असे सांगितले होते. तिने जैन यांच्या पत्नीला विश्वासात घेतले. त्यांना संपत्तीची माहिती विचारून घेतली. सोन्याची माहिती घेतल्यावर तिने सोने बँकेच्या लॉकरमध्ये काढून घरी आणून ठेवण्यास सांगितले. या सोन्याच्या दागिन्यांमध्येच वाईट शक्ती असून हे दागिने घरातील विशिष्ट ठिकाणी ठेवण्यास सांगितले होते.=
सय्यद ही मिझाड व सोनार या दोघींकडे हळदकुंकु लावलेले लिंबू देत असे. या दोघी जैन यांच्या बेडमध्ये किंवा कपाटात हे लिंबू लपवून ठेवत. त्यानंतर सय्यद जैन यांच्या पत्नीला बोलावून घेत. त्यांना करणी केल्याचे सांगत सोबत घरी जाऊन लिंबू काढून दाखवत असे.
या सर्व प्रकाराला चमत्कार समजून तिच्यावर त्यांनी विश्वास ठेवला. सय्यद देवपुजेसाठी जैन यांच्या पत्नीला घरी बोलावून घेत. ही संधी साधत मिझाड आणि सोनार थोडेथोडे सोने लंपास करीत.