पहिल्या फेरीत ३८ हजार ८५८ विद्यार्थ्यांना प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:16 AM2021-08-28T04:16:06+5:302021-08-28T04:16:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनुसार अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनुसार अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या फेरीत ३८ हजार ८५८ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. या विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात ऑनलाइन पद्धतीने ३० ऑगस्टपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
अकरावी प्रवेशासाठी विज्ञान शाखेतून सर्वाधिक १९ हजार १५३, वाणिज्य शाखेत १५ हजार २५०, कला शाखेत ३ हजार ८३४ आणि व्होकेशनल अभ्यासक्रमात ६२१ विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. तसेच महाराष्ट्र बोर्डाच्या ३३ हजार १९७ विद्यार्थ्यांना महाविद्यालय जाहीर झाले आहेत.
पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय प्रवेश पद्धतीनुसार अकरावीची पहिली फेरी राबविण्यात येत आहे. प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आणि महाविद्यालयांचे कटऑफ गुण जाहीर झाले. पुणे विभागातून ३११ कनिष्ठ महाविद्यालयात १ लाख ११ हजार २०५ जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्या फेरीतील ५६ हजार ७६७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यापैकी ३८ हजार ८५८ विद्यार्थ्यांना महाविद्यालय जाहीर झाले.
इतर माध्यमांत सीबीएसईचे ४ हजार ३३ हजार, आयसीएसईच्या १ हजार ४०६, आयजीसीएसई २७, नॅशनल इन्स्टट्यिूट ऑफ ओपन स्कूलिंग ७९, इतर माध्यमांचे ११२ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले आहेत. कला शाखेतून पहिल्या पसंतीक्रम दिलेल्या २ हजार ४५६ आणि वाणिज्य शाखेतून ८ हजार ५७०, तर विज्ञान शाखेतून २२ हजार ६६५ जणांना प्रवेश जाहीर झाला आहे.
-----
पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक
पहिल्या यादीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालयात मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २२ हजार ६६५ इतकी आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे, त्यांनी तातडीने प्रवेश निश्चित करावा. प्रवेश घेतला नाही तर, अन्यथा तीन प्रवेश फेऱ्या पूर्ण होईपर्यंत त्यांना प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर राहावे लागेल. विशेष फेरी सुरू झाल्यानंतर त्यांना त्यांची संमती (consent) नोंदवल्यानंतर प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे, असे केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचे सदस्य सचिव तथा पुणे विभागाच्या सहायक संचालक मीना शेंडकर यांनी स्पष्ट केले आहे.
---
प्रवेशासाठी कॉलेजमध्ये गर्दी करू नका
सर्व प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याची काही कागदपत्रे अपलोड करायची राहिल्यास त्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये जाऊन कागदपत्रे अपलोड करता येणार आहे. महाविद्यालय लॉगिनमध्ये विद्यार्थ्यांनी अपलोड केलेली कागदपत्रे पाहता येतील. त्यामुळे कागदपत्रे पाहण्याचे कारण देऊन विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात गर्दी करू नये. ‘पेमेंट गेट वे’चा वापर करून सर्व प्रवेश प्रक्रिया होणार आहे.
---
...तर प्रवेश रद्द करणार
नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र (एनसीएल) नाही अशा विद्यार्थ्यांनी अर्जाची प्रत/पावती अपलोड करावी. एनसीएल सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना २१ दिवसांची मुदत मिळेल. त्यात ते सादर न केल्यास प्रवेश रद्द करण्यात येणार असल्याचे मीना शेंडकर यांनी स्पष्ट केले आहे.