Zika Virus: एरंडवण्यातील पटवर्धन बागेत ३८ वर्षीय पुरूषाला संसर्ग; पुण्यात झिका रुग्णांची संख्या १६ वर
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: July 10, 2024 05:06 PM2024-07-10T17:06:09+5:302024-07-10T17:06:58+5:30
या रुग्णांच्या परिसरातील २६७ गर्भवती महिला या जाेखमीच्या क्षेत्रात येत असून त्यांनी संसर्ग हाेउ नये यासाठी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली
पुणे: एरंडवणेतील पटवर्धन बागेतील एका ३८ वर्षीय पुरूषाचा झिकाचा अहवाल पाॅझिटव्ह आला आहे. त्याला ६ जुलै राेजी ताप, लाल चटटे अशी लक्षणे हाेते. रक्ताची तपासणी केली असता त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून रुग्णांची संख्या आता १६ वर पाेचली आहे.
शहरात सात क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत १५ झिका रुग्ण सापडले आहेत. मात्र, या रुग्णांच्या परिसरातील २६७ गर्भवती महिला या जाेखमीच्या क्षेत्रात येत असून त्यांनी संसर्ग हाेउ नये यासाठी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्या क्षेत्रातील ११८ गर्भवतींचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी आतापर्यंत ८ गर्भवतींचे रक्तनमुने झिकासाठी पाॅझिटिव्ह आले आहेत. अजुन काही नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे.
झिकाचा गर्भवती महिलांना संसर्ग झाल्यास त्यांच्या बाळाला व्यंग निर्माण हाेण्याचा धाेका असल्याने गर्भवती बाधित हाेउ नये ही काळजी आराेग्य यंत्रणेकडून घेतली जाते. एखादा पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्यास त्या रुग्णाच्या घरात धुरफवारणी केली जाते. तसेच त्यांच्या राहत्या घरात आणि साेसायटीमध्ये काही डासांचे ब्रीडिंग स्पाॅट आहेत का याची देखील आराेग्य विभागाचे पथक जाउन पाहणी करते. त्यामध्ये ब्रीडिंग आढळले तर त्यामध्ये डासनाशक अबेट टाकण्यात येते आणि रुग्णाच्या परिसरापासून दाेन ते तीन किमी अंतरावरील गर्भवतींचे रक्त आणि लघवीचे नमुने तपासणीसाठी एनआयव्ही कडे पाठवले जातात.