आॅनलाइन परवानगीसाठी ३८० मंडळांचेच अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:37 AM2017-08-15T00:37:50+5:302017-08-15T00:37:53+5:30

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेश मंडळांना विविध प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात.

380 mandal applications for online permission | आॅनलाइन परवानगीसाठी ३८० मंडळांचेच अर्ज

आॅनलाइन परवानगीसाठी ३८० मंडळांचेच अर्ज

googlenewsNext

पुणे : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेश मंडळांना विविध प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात. गेल्या काही वर्षांपासून एक खिडकी योजना सुरू करण्यात आली होती. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत यंदाच्या वर्षी पोलिसांनी चक्क मंडळांसाठी आॅनलाइन परवानगीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत ३८० मंडळांनी आॅनलाइन अर्ज केले असून दहीहंडीनंतर त्यामध्ये आणखी वाढ होईल, अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांची लगबग सुरू झाली आहे. अनेक मंडळांनी मंडप, स्पीकर आणि सजावटीच्या कामाला सुरुवात केली आहे. मंडळांना वाहतूक पोलीस, महापालिका आणि पोलीस ठाण्यांची परवानगी आवश्यक असते. दरवर्षी मंडळे स्थानिक पोलीस ठाण्यांमधील एक खिडकीमध्ये जाऊन परवानगीसाठी अर्ज दाखल करतात. या अर्जांची पडताळणी होऊन त्यांना परवानगी दिली जाते. मात्र, यावर्षी पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर करीत आॅनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली. मंडळांची बैठक घेऊन या योजनेची माहिती दिली होती.
ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत ३८० मंडळांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील १५० अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. ५० अर्ज मनपाकडे परवानगीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. मंडळांनी आॅनलाइन अर्ज केल्यानंतर हे अर्ज वाहतूक शाखेकडे पाठविले जातात. त्यानंतर ते मनपाकडे जातात. त्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यांकडून अंतिम परवानगी देण्यात येते. अनेक मंडळांनी अपूर्ण अर्ज भरल्याने, तसेच आवश्यक कागदपत्रे न जोडल्याने पडताळणीमध्ये अडचणी येत आहेत. सध्या दहीहंडी उत्सवाच्या तयारीमध्ये मंडळांचे कार्यकर्ते व्यस्त आहेत. दहीहंडी झाल्यानंतर अर्जांची संख्या झपाट्याने वाढेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. गणेशचतुर्थीनंतरही अनेक मंडळांचे अर्ज येत राहतात. आॅनलाइन अर्ज दाखल करण्याच्या सुविधेचा जवळपास सर्वच महत्त्वाच्या मंडळांनी लाभ घेतला आहे. मानाचा पहिला कसबा गणपती, सेवा मित्र मंडळ, हत्ती गणपती मंडळ, शाहू चौक मंडळ यांच्यासह अनेक मोठ्या मंडळांनी आॅनलाइन परवानगी मिळवली आहे.
>नेमकी कागदपत्रे न जोडल्याने अडचणी
आॅनलाइन अर्ज करताना गणेश मंडळांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. अर्ज भरण्यासाठी आवश्यक माहिती व कागदपत्रे मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव, सरचिटणीस, खजिनदार यांचे नाव, ई-मेल, मोबाईल व फोटो अपलोड करावे लागतात. धर्मादाय आयुक्त नोंदणी प्रमाणपत्र मागील वर्षीचे मनपा परवाने, पोलीस परवाने, ना-हरकतपत्रही जोडावे लागते. ही कागदपत्रे आॅनलाइन अर्ज भरताना अ‍ॅटॅच करावी लागतात. नेमकी ही कागदपत्रे न जोडल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे मंडळांनी आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: 380 mandal applications for online permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.