कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसपासून ३८ हजार नागरिक वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:07 AM2021-04-29T04:07:37+5:302021-04-29T04:07:37+5:30
भोर: तालुक्यातील लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्याने शहरासह ग्रामीण भागातील सर्वच्या सर्व २० लसीकरण केंद्रे बंद असल्याचे चित्र आहे. ...
भोर: तालुक्यातील लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्याने शहरासह ग्रामीण भागातील सर्वच्या सर्व २० लसीकरण केंद्रे बंद असल्याचे चित्र आहे. त्यामुळे लस उपलब्ध करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
भोर तालुक्यात लसीकरणासाठी पाच प्राथमिक केंद्रे आणि १४ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अशी ग्रामीण भागासाठी १९ तर शहरासाठी रामबाग येथील उपजिल्हा रुग्णालय अशी २० ठिकाणी लसीकरण केंद्रे असून, या ठिकाणी ६० आणि ४५ वर्षांवरील लोकांचे लसीकरण केले जात आहे. मात्र शासनाकडून कोरोना लसीचा तुटवडा असल्याने बुधवारी दिवसभर भोर तालुक्यातील सर्वच्या सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे लस घेण्यासाठी आलेल्या लोकांना हेलपाटा झाला.
भोर तालुक्यात ५५ हजार ५२३ लाभार्थ्यांपैकी पहिला डोस ४३ हजार २२४ जणांना तर दुसरा डोस ४ हजार ४५२ अशा एकूण ४७ हजार ६७६ नागरिकांना डोस देण्यात आला आहे. पहिल्या डोसमधील १२ हजार २९९ तर दुसऱ्या डोसमधील ३८ हजार ७७२ लाभार्थ्यांना असा एकूण ५१ हजार ०७१ लाभार्थ्यांना डोस देण्याचा राहिलेला आहे.तालुक्यात पहिल्या डोसचे ८६% काम झालेले आहे.तर दुसऱ्या डोसचे निम्म्यापेक्षा अधिक काम शिल्लक राहिलेले आहे
त्यामुळे ४५ व ६० वर्षांवरील अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित राहिलेले आहेत.
तालुक्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांना आॅक्सिजन कमी पडत आहे. यामुळे कोरोना रुग्णांचा आकडाही वाढतोय. यामुळे शासनाकडून लवकरात लवकर लस उपलब्ध करुन लसीकरणाचे राहिलेले काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, लस उपलब्धता नसल्यामुळे बुधवारी लसीकरण केंद्रे बंद होती. मात्र गुरुवारी लस उपलब्ध होईल आणि पुन्हा लसीकरणाला सुरुवात होईल, असे भोर पंचायत समितीचे गटविकास आधिकारी विशाल तनपुरे यांनी सांगितले.