३८ हजार कोंबड्या, ३५ हजार अंडी केली नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:12 AM2021-01-23T04:12:04+5:302021-01-23T04:12:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बर्ड फ्लू नियंत्रणासाठी आजार आढळलेल्या ठिकाणच्या कोंबड्या, त्यांचे खाद्य व अंडीही नष्ट करण्यात येत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बर्ड फ्लू नियंत्रणासाठी आजार आढळलेल्या ठिकाणच्या कोंबड्या, त्यांचे खाद्य व अंडीही नष्ट करण्यात येत आहेत. पशुसंवर्धन खात्याने आतापर्यंत ३८ हजार ६५८ कोंबड्या नष्ट केल्या. सुमारे ५२ हजार ६८४ किलो पशुखाद्य आणि ३५ हजार १४६ अंडीही जमिनीत खोलवर पुरण्यात आली आहेत.
राज्यातील पोल्ट्री फार्मची संख्या काही हजारांच्या घरात असून, ७ कोटींपेक्षा जास्त कोंबड्या त्यात आहेत. वाड्या-वस्त्यांवर पाळल्या जाणाऱ्या कोंबड्यांची (बॅकयार्ड पोल्ट्री) संख्याही मोठी आहे. बर्ड फ्लू आटोक्यात आणण्यासाठी या कोंबड्यांवर, पोल्ट्रींवर लक्ष ठेवले जात आहे.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, आजार आढळलेल्या पोल्ट्री फार्म, तसेच गावातील कोंबड्या मारून त्या जमिनीत खोलवर पुरल्या जात आहेत. त्यावर चुनखडी टाकली जाते. कोंबड्यांबरोबरच त्या गावातील अंडी कोंबडीखाद्यही याच पद्धतीने नष्ट करण्यात येत आहे.
उडत्या पक्षांच्या विष्ठेमधून हा आजार वेगाने फैलावत असल्याचा तज्ज्ञांचा निष्कर्ष आहे. त्यामुळे गावोगावच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना पक्ष्यांच्या विष्ठेकडे लक्ष ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. पक्ष्यांची विष्ठा आढळली की, त्याचीही विल्हेवाट जमिनीत खड्डा खोदून शास्त्रीय पद्धतीने लावण्यास अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.
चौकट
मृत पक्षी सर्व जिल्ह्यात
जानेवारी, २०२१ मध्ये राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी १३ हजार ७९२ वेगवेगळ्या पक्ष्यांच्या अचानक मृत्यूची नोंद पशुसंवर्धन विभागाकडे झाली आहे. बुधवारी (दि. २०) एकाच दिवशी १ हजार ४० पक्षी मृत झाल्याची नोंद झाली. त्यात ९३२ कोंबड्या आहेत. बगळे, पोपट, चिमण्यांची संख्या ४२ तर कावळ्यांची ६६ आहे. या पक्ष्यांचे नमुने भोपाळ व पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, त्यांचे अहवाल यायचे आहेत. राज्यात सर्वच जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पक्षी अचानक मृत होण्याच्या घटना आढळल्या असून, त्यामुळे पशुसंवर्धन विभागापुढचे नियंत्रणाचे आव्हान वाढले आहे.