शहरात ३८६ ठिकाणे असुरक्षित
By admin | Published: December 17, 2015 02:20 AM2015-12-17T02:20:53+5:302015-12-17T02:20:53+5:30
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अत्याधुनिक महानगराकडे वाटचाल करणाऱ्या पुण्यात महिलांच्या सुरक्षेला आजही महत्त्व दिले जात नसल्याची खेदजनक बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.
पुणे : स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अत्याधुनिक महानगराकडे वाटचाल करणाऱ्या पुण्यात महिलांच्या सुरक्षेला आजही महत्त्व दिले जात नसल्याची खेदजनक बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. रात्री तर सोडाच, शहरातील संध्याकाळची वेळ ही महिलांसाठी सुरक्षित नाही. सम्यक या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या शहरव्यापी सर्वेक्षणात पुण्यातील ३८६ ठिकाणे महिलांसाठी असुरक्षित असल्याचे दिसून आले आहे.
पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये शिक्षणासाठी आलेल्या मुली-महिला, दिवस-रात्र काम करणाऱ्या महिला यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. त्यामुळे प्रवासाच्या वेळी किंवा कामावरून उशिरा परत येताना महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहते.
केवळ महिलांसाठी शहर असुरक्षित म्हणून नुसता आरडा-ओरडा करण्यापेक्षा त्यात नेमकी ठिकाणे कोणती, कोणत्या कारणाने ती असुरक्षित वाटू शकतात, हे जाणून घेण्याची गरज ‘सम्यक संवाद व संशोधन केंद्र’ या संस्थेला जाणवली आणि त्यांनी सेफ्टीपिन या संस्थेच्या सहकार्याने ‘सेफ्टीपिन’ या अॅप्लिकेशनच्या माध्यमाने शहरातील १६ भाग करून त्यातील २००० ठिकाणचे आॅडिट केले आहे. या अभ्यासातून महिलांना तब्बल ३८६ ठिकाणे असुरक्षित वाटत असल्याचे पुढे आले आहे.
याविषयी सम्यक संस्थेतील कार्यकर्ते शंकर गवळी म्हणाले, शहराचे १६ प्रमुख भाग करण्यात आले त्यामध्ये स्वारगेट, औंध, बाणेर, कॅम्प, डेक्कन, कर्वेनगर, वारजे माळवाडी, हडपसर, खडकी, बोपोडी, दापोडी, कोंढवा, कोरेगाव पार्क, सिंहगड रस्ता, शिवाजीनगर, येरवडा, पुणे रेल्वे स्थानक, लोहगाव आणि कात्रज आदी ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा घेतला. सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत हे आॅडिट करण्यात आले.
कर्वे इन्स्टिट्यूट व सेहेर या संस्थेच्या १७ प्रतिनिधींनी या सर्वेक्षणात भाग घेतला. त्यांना महिला सुरक्षेच्याबाबतीत जाणीवजागृती करण्यात आली त्यानंतर त्यांनी प्रत्येक ठिकाणी महिलांशी संवाद साधून त्या ठिकाणाची माहिती सेफ्टीपिनमध्ये नोंदवली आहे.
विशेष अॅप्लीकेशन
या अॅप्लिकेशनमध्ये महिलांना असुरक्षित वाटण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या विविध मुद्द्यांचा समावेश केला आहे. त्यात प्रामुख्याने रस्त्यावरील दिवे, सुरक्षारक्षक, वाहतूक सुविधांची उपलब्धता, पदपथ, नागरिकांची वर्दळ, परिसरातील सदनिका व घरांची स्थिती, महिला-पुरुषांची संख्या, पळून जाण्यासाठी असणारे प्रवेशमार्ग आणि मुख्यत्वेकरून सुरक्षेविषयीची महिलांची भावना आदी गोष्टी जाणून त्याबाबत या अॅप्लिकेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी सेफ्टीपिन
अंधाऱ्या किंवा कमी वस्तीत अधिक भीती वाटणे स्वाभाविक
आहे. त्यानुसार बहुतांश आॅडिटर्सने एनडीए, पुणे मुंबई हायवे
परिसरात छळाच्या काही तक्रारी घडल्याचे व अधिक असुरक्षित वाटल्याचे नमूद केले.
बसडेपोमध्ये मनपा व डेक्कन सोडल्यास प्रकाश व वर्दळ कुठेच
जाणवली नाही. त्यातही स्त्री-पुरुष वर्दळ मोठ्या प्रमाणात दिसून येते.
मात्र अन्यत्र उपनगरांच्या परिसरात बसडेपोवरून वाहतुकीची सोय कमी झालेली दिसून आली.
पथदिवे सुधारणे, पोलिसांची गस्त वाढवणे, पदपथ वाढविण्याची गरज या वेळेस अधोरेखित करण्यात आली. यासाठी स्थानिक प्रशासन, स्थानिक लोकनेते, सामाजिक संस्था यांच्या मदतीने सुधारणा करण्याची गरज आहे. त्याचबरोबर पथदिवे, डेपोवरील प्रकाश यांसाठी स्थानिक लोकसहभाग वाढवून काम करवून घेण्याची गरज असल्याचेही गवळी यांनी सांगितले.
स्थानिकांसाठी सुरक्षित वाटणारे इतरांसाठी असुरक्षित
काही वेळा काही ठिकाणे स्थानिक लोकांना सुरक्षित वाटली. कारण त्यांच्या परिचयाचा प्रदेश किंवा लोकवस्ती माहीत असल्यामुळेही त्यांना तसे वाटणे स्वाभाविक आहे; मात्र आगंतुक व्यक्तीला ती जागा असुरक्षित वाटू शकते, असेही सर्वेक्षणात आढळले.
पोलीस/सुरक्षारक्षक नाहीत
रात्री ९ नंतर सुमारास पोलीस सुरक्षा किंवा खासगी सुरक्षारक्षकांची संख्या अतिशय कमी आढळली. केवळ पोलिसांच्या किंवा अगदी इमारतींबाहेर असणाऱ्या खासगी सुरक्षारक्षकांमुळेही सुरक्षित वाटत असल्याच्या भावना आहेत त्यामुळे पोलिसिंग वाढविण्याची गरज ही सर्वेक्षणात अधोरेखित झाली.
डेंजर झोनही नोंदवू शकता
सेफ्टिपिन अॅपमध्ये केवळ असलेल्या माहितीचा उपयोग होतो, असे नव्हे तर एखाद्या ठिकाणच्या सद्य परिस्थितीविषयीही माहिती नोंदविण्याची सोय आहे. पथदिवे बंद आहेत किंवा असुरक्षित वाटण्याच्या भावना त्यात मांडल्या जाऊ शकतात. त्यामुळे नव्या व्यक्तीसाठी त्याचा निश्चित उपयोग करता येणार आहे.
सेफ्टिपिन अँप
कुठलीही महिला अडचणीत आली, की तिच्याकडे एक हक्काची गोष्ट असतेच असते, ती म्हणजे सेफ्टी पिन. हीच संकल्पना विचारात घेऊन आता शहरांमधील महिलांच्या सुरक्षेकरिता ‘सेफ्टी पिन’ नावाचे एक नवीन अॅप्लिकेशन तयार करण्यात आले असून मोबाईलवर इंटरनेटची सुविधा असलेल्या महिलांना या अॅप्लिकेशनचा चांगलाच फायदा होऊ शकणार आहे. या अॅपवर २००० ठिकाणची माहिती असल्याने संध्याकाळच्या वेळेस अमुक ठिकाणी जाण्यापूर्वी त्याची माहिती करून घेऊन, तेथील बसव्यवस्था, वर्दळीचा विचार करून नियोजन करणे शक्य होईल.
आठनंतर वाहतुकीच्या सोयी रोडावतात
शहरातील बससेवा, आॅटो रिक्षांची सेवा चांगली आहे, मात्र रात्री ८ नंतर बस व आॅटो रिक्षांची संख्या रोडावण्यास सुरुवात होते, तसेच अनेक बसस्टॉपवर बसण्याची सोय व पुरेसा प्रकाश नसल्यानेही असुरक्षित वाटत असल्याचे महिलांनी नोंदविले आहे.
पथदिवे बंद; दुकानांचेच प्रकाश
शहरातील मध्यवस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकाश जाणवत असल्याची नोंद आहे, मात्र जसे जसे शहरातून उपनगराकडे धाव घेतली जाते त्या वेळेस काही ठिकाणी केवळ रस्त्यांवरच्या गाड्या तसेच दुकानांचा उजेड आहे. मात्र दुकाने बंद झाल्यानंतर उजेड नसणार, याची माहिती या अॅपद्वारे मिळू शकणार आहे. बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन, कर्वे रस्त्यावर पुरेसा प्रकाश आहे, मात्र कात्रज-सातारा रस्ता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परिसर, संगमपूल येथे अधिक अंधार असतो.
सुरक्षा आॅडिटनुसार
सुरक्षित ठिकाणे : ६७६
कमी सुरक्षित : ९४४
असुरक्षित : ३८६