शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने २ महिलांसह एकाला ३९ लाखांचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Published: May 5, 2024 01:54 PM2024-05-05T13:54:37+5:302024-05-05T13:54:49+5:30
शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा आणि परतावा मिळेल, असे आमिष दाखवले जाते
पुणे : शेअर ट्रेडिंगच्या नादात दोन महिलांसह एकाने तब्बल ३९ लाख रुपये गमावल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवारी (दि. ४) संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये तिघांनी फिर्याद दिली आहे.
पहिल्या घटनेत बाणेर परिसरात राहणाऱ्या पांडुरंग रामचंद्र तावरे (वय- ६१) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हा प्रकार ७ जानेवारी ते २७ मार्च यादरम्यानच्या काळात घडला आहे. सायबर चोरट्याने व्हॅट्सऍपवरून तक्रारदार यांना संपर्क साधला. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा आणि परतावा मिळेल असे प्रलोभन दाखवले. तक्रारदार यांनी आमिषाला बळी पडून पैसे गुंतवण्यास होकार दिल्यानंतर त्यांना एक लिंक पाठवून व्हाटसअप ग्रुप जॉईन करायला सांगितले. ग्रुप जॉईन केल्यावर ट्रेडिंग करण्यासाठी एक ऍप डाऊनलोड करायला सांगितले. फिर्यादी यांनी अप्लिकेशन डाउनलोड करून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांच्या ऍपवर शेअर ट्रेडिंग मधून फायदा झाल्याचे दिसून येत होते. मात्र त्यांना ते पैसे काढता येत नव्हते. यावेळी त्यांनी सायबर चोरट्याशी संपर्क केला तेव्हा वेळोवेळी आणखी पैसे भरायला सांगितले. पैसे मिळणार नाही याची खात्री झाल्यावर तक्रारदार यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पुढील तपास पोलीस निरीक्षक जगताप करत आहेत.
दुसऱ्या प्रकरणात, धनकवडी परिसरात राहणाऱ्या एका ३८ वर्षीय महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार २१ डिसेंबर २०२३ ते २१ मार्च २०२४ या काळात सायबर चोरट्यांनी शेअर ट्रेडिंग करून पैसे मिळवण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून १० लाख ३१ हजार रुपये घेतले. मात्र परतावा न देता फसवणूक केल्याने सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस निरीक्षक उत्तम भजनावले करत आहेत.
तिसऱ्या प्रकरणात, लोणीकाळभोर परिसरात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेला सायबर चोरट्यांनी फेसबुकवरून संपर्क साधला. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवले. तक्रारदार महिलेला ३ लाख ४१ हजार रुपये भरायला भाग पाडले. परतावा न मिळाल्याने लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.