जिल्ह्यात १६ कारखान्यांचे ४९ लाख टन ऊसगाळप, ५१ लाख ६७ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 12:33 AM2018-12-29T00:33:48+5:302018-12-29T00:34:00+5:30
जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी मिळून १०.७० चा साखर उतारा ठेवून ४९ लाख ८४ हजार मे. टन उसाचे गाळप करून ५१ लाख ६७ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.
सोमेश्वरनगर : जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी मिळून १०.७० चा साखर उतारा ठेवून ४९ लाख ८४ हजार मे. टन उसाचे गाळप करून ५१ लाख ६७ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर, ११.३६ चा सरासरी साखर उतारा ठेवून सोमेश्वर कारखान्याने साखर उताऱ्यात बाजी मारली आहे.
चालू गळीत हंगामात मंत्री समितीच्या निर्णयानुसार २० आॅक्टोबरला राज्यातील साखर कारखाने सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली. मात्र, दुसरीकडे उसाचे जादा क्षेत्र असल्याने १ आॅक्टोबरलाच गाळपाची परवानगी मिळावी, असे साखर कारखानदारांचे म्हणणे होते. उशिरा परवानगी दिल्याने प्रत्यक्षात साखर कारखाने सुरू होण्यासाठी ५ नोव्हेंबर उजाडले. त्यामुळे वाढलेले उसाचे क्षेत्र पाहता, साखर कारखान्यांना वेळेत उसाचे गाळप करणे जिकिरीचे बनणार आहे. त्यातच तुटणाºया उसाला हुमणीचा पादुर्भाव झाल्याने तुटणाºया उसाच्या क्षेत्रात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांची धुराडी जोमाने सुरू आहेत. प्रत्येक कारखाना आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस लवकरात लवकर संपवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक कारखान्यांना स्वत:च्याच कार्यक्षेत्रात मुबलक ऊस उपलब्ध असल्याने अनेक कारखान्यांनी चालू हंगामात गेटकेन ऊस आणण्यास टाळाटाळ केली आहे. तर, कार्यक्षेत्रातील अनेक भागांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने त्या भागांमध्ये कारखान्यांनी प्राधान्याने ऊसतोडी दिल्या आहेत.
जिल्ह्यातील अनेक कारखान्याचा ‘डे’ चा साखर उतारा पावणेबारावर पोहोचला आहे. तर, ११.३६ चा सरासरी साखर उतारा ठेवून सोमेश्वर कारखान्याने साखर उताºयात आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील १६ कारखान्यांनी मिळून ४९ लाख ८४ हजार ४९७ मे. टन ऊसाचे गाळप करून ५१ लाख ६७ हजार ९५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. ५ लाख ३२ हजार २८० मे. टन उसाचे गाळप करून ५ लाख ७५ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेत इंदापूर कारखान्याने ऊस गळितात आघाडी घेतली आहे.
तर, ५ लाख ३१ हजार ९९० मे. टन उसाचे गाळप करून ५ लाख ६६ हजार २०० पोत्याचे उत्पादन घेत बारामती अॅग्रो कारखान्याने दुसरा, तर ४ लाख ५५ हजार १४० मे. टन उसाचे गाळप करून ४ लाख ८५ हजार पोत्याचे उत्पादन घेत दौंड शुगर कारखान्याने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
तर, ११.६४चा सरासरी साखर उतारा ठेवून सोमेश्वर कारखान्याने आघाडी घेतली आहे. तर, ११.२४ चा साखर उतारा ठेवून भीमाशंकरने व १०.९८चा साखर उतारा ठेवून विघन्हर कारखान्याने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक ठेवला आहे.
साखरेचा गोडवा वाढला...
नोव्हेंबर ते जानेवारी हे महिने साखर कारखान्यांसाठी फायदेशीर समजले जातात. हा कालावधी ‘हाय रिकव्हरी पिरीयड’ म्हणून ओळखला जातो. या कालावधीत थंडीचे प्रमाण चांगले असल्याने कारखान्यांच्या साखर उताºयात वाढ होऊन आर्थिक फायदा होतो. गेल्या १५ दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढल्याने उसाचा गोडवा वाढला आहे.