विमानाने पुण्यात आलेले ३९ जण बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:10 AM2021-01-04T04:10:32+5:302021-01-04T04:10:32+5:30
पुणे : गुजरात, दिल्ली, राजस्थान व गोवा या चार राज्यांतून मागील महिनाभरात विमानाने पुण्यात आलेले ३९ प्रवासी कोरोनाबाधित आढळून ...
पुणे : गुजरात, दिल्ली, राजस्थान व गोवा या चार राज्यांतून मागील महिनाभरात विमानाने पुण्यात आलेले ३९ प्रवासी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. या कालावधीत एकूण २ हजार ८७७ जणांची कोरोना चाचणी केली होती, अशी माहिती विमानतळ संचालक कुलदीप सिंग यांनी दिली.
राज्य शासनाने गुजरात, दिल्ली, गोवा व राजस्थान या चार राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या विमान प्रवाशांना कोरोनाची आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. विमानतळांवर चाचणीची सुविधा केली आहे. पुणे विमानतळावर उतरल्यानंतर आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल दाखविणे बंधनकारक आहे. ज्यांच्याकडे हा अहवाल नसेल त्यांना विमानतळावरच चाचणी करण्यास सांगितले जाते. त्यानंतरच त्यांना घरी जाण्याची मुभा दिली जाते. १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत पुण्यात या राज्यांतून ४८७ विमाने उतरली. त्यामधून ६२ हजार ३२ प्रवासी आले. त्यापैकी २ हजार ८७७ प्रवाशांची विमानतळावर चाचणी करण्यात आली. चाचणीमध्ये ३९ प्रवाशांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांची माहिती महापालिका प्रशासनाला देऊन पुढील कार्यवाही केली.
२५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत एकूण १७ प्रवासी बाधित आढळून आले होते. सर्वाधिक प्रवासी दिल्लीतून येणारे असून हे प्रमाण जवळपास दीड हजारांहून अधिक आहे. त्यापाठोपाठ राजस्थान व गुजरातहून येणाऱ्या प्रवाशांची संख्या तुलनेने खूप कमी आहे. तर गोव्याहून सध्या विमानसेवा सुरू नाही. सध्याही दररोज सुमारे २ हजारांहून अधिक प्रवासी या तीन राज्यांतून पुण्यात येत आहेत, तर एकूण प्रवासीसंख्या सुमारे ८ ते ९ हजार एवढी आहे.
--
१ ते ३१ डिसेंबरदरम्यानची स्थिती
चार राज्यांतून विमाने उतरली - ४८७
प्रवासी - ६२,०३२
चाचण्या - २,८७७
बाधित - ३९