लॉकडाऊनच्या काळात वीजबिलाची थकबाकी ३९४ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:12 AM2021-06-09T04:12:02+5:302021-06-09T04:12:02+5:30
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जाताना, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या गेल्या दोन महिन्यांत पुणे, सातारा, सोलापूर, ...
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जाताना, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या गेल्या दोन महिन्यांत पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये ९ लाख ९० हजार वीजग्राहकांनी वीज बिलांचे ३९४ कोटी २२ लाख रुपये थकविले आहेत.
वीज बिल थकबाकीदारांमध्ये लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहक असून, सद्यस्थितीत या वर्गवारीतील २८ लाख ५५ हजार ग्राहकांकडे १ हजार ३५९ कोटी ४ लाखांची थकबाकी आहे. त्यामुळे वीजबिलाचा भरणा करून ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.
पुणे प्रादेशिक विभागात मार्च अखेर लघुदाब वर्गवारीच्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक १८ लाख ६५ हजार ५० ग्राहकांकडे ९६४ कोटी ८३ लाख रुपयांची थकबाकी होती. मात्र एप्रिल व मे महिन्यांत वीजबिलांचा भरणा न झाल्यामुळे सद्यस्थितीत २८ लाख ५५ हजार वीजग्राहकांकडे ही थकबाकी १ हजार ३५० कोटी ४ लाख एवढी झाली आहे. या दोन महिन्यात सर्वाधिक ८ लाख ६ हजार ८६६ घरगुती ग्राहकांकडे २१० कोटी ३१ लाख एवढी थकबाकी झाली आहे. तर १ लाख ६० हजार ४५० वाणिज्यिक ग्राहकांकडे ११७ कोटी तसेच २२ हजार ८२४ औद्योगिक ग्राहकांकडे ६६ कोटी ८९ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे.
---------------------------