राफेलनंतर रस्त्यांचे थ्रीडी मॅपिंग दसॉल्वकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 12:44 AM2018-10-23T00:44:56+5:302018-10-23T00:45:04+5:30
राफेल विमान खरेदीतील कथित घोटाळ्यावरून गाजत असलेल्या दसॉल्व या कंपनीने पुण्यातील रस्त्यांचे थ्री डी मॅपिंग करण्याची तयारी दर्शवली आहे.
पुणे : राफेल विमान खरेदीतील कथित घोटाळ्यावरून गाजत असलेल्या दसॉल्व या कंपनीने पुण्यातील रस्त्यांचे थ्री डी मॅपिंग करण्याची तयारी दर्शवली आहे. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीने या कामाचा प्रस्ताव काही कंपन्यांबरोबर प्राथमिक चर्चा करून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर आणला होता. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रस्तावाची माहिती सभागृहाला दिली. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने मतदानाने हा विषय मंजूर करून घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला, तर काँग्रेस तटस्थ राहिली. शिवसेनेत या विषयावरून दुफळी झाली.
या विषयाबरोबरच स्मार्ट एलिमेंट्स हा विषयही याच पद्धतीने मंजूर करण्यात आला. हे दोन्ही विषय स्मार्ट सिटी कंपनी त्यांच्या विशेष कार्यक्षेत्रात म्हणजे औंध-बाणेर-बालेवाडीमध्ये राबवणार आहे. मात्र ते पुणे शहरातही राबवावेत, असे संचालक मंडळाने सुचवल्यावरून कंपनीने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवले होते. त्यावेळी माहिती देताना कंपनीचे मुख्य कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप यांनी काही परदेशी कंपन्यांबरोबरच दसॉल्व या कंपनीनेही हे काम करण्याची तयारी दर्शवली असल्याचे सभागृहाला सांगितले. त्यांच्याशी कामाच्या संबंधाने प्राथमिक चर्चा झाली असे ते म्हणाले. काँग्रेसचे अरविंद शिंदे म्हणाले, की याआधी कंपनीने त्यांच्या विशेष क्षेत्रांसह अनेक उपक्रम शहरातही राबवले. त्यावेळी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची परवानगी घेतली नाही. मग आताच ते का आणले? कसली अडचण झाली? राष्ट्रवादीचे दिलीप बराटे, सुभाष जगताप, शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार यांनी विषयांना विरोध केला.
बराटे म्हणाले, की या विषयाचे डॉकेट (माहिती) विषयाला जोडलेले नाही. तर सुतार यांनी याचा खर्च कोण करणार? अशी विचारणा केली.
विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले, की प्रस्ताव प्रशासनाने मांडायचा तर तो नगरसेवकांच्या माध्यमातून का मांडला जातो आहे? शहरात याआधी कामे केलीत त्याची परवानगी घेतली होती का? सभागृहनेते श्रीनाथ भिमाले म्हणाले, की पुण्यात अशी वेगळ्या प्रकारची कामे होत आहेत, त्यात मोडता घालू नये. महापालिकेला यात कोणताही खर्च करावा लागणार नाही. अखेर मतदानाने विषय मंजूर झाले.
भाजपाने विषयाच्या बाजूने मतदान केले. काँग्रेस तटस्थ राहिली. राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला. शिवसेनेत या विषयांवरून दोन गट पडले. विशाल धनवडे व पृथ्वीराज सुतार यांनी विरोध केला. गटनेते संजय भोसले, पल्लवी जावळे, संगीता ठोसर यांनी भाजपाला साह्य केले. राष्ट्रवादीनेच स्मार्ट सिटी त्यांच्या सत्तेच्या काळात मंजूर केली व आता तेच या दोन्ही विषयांना विरोध करत आहे अशी टीका काँग्रेसने केली.
भाजपाच्या गोपाळ चिंतल यांनी प्रस्तावाची सविस्तर माहिती द्यावी अशी मागणी केली. त्याचा उल्लेख करून शिंदे म्हणाले, राफेल प्रकरणातील कंपनीने तयारी दर्शवलेल्या कामाची माहिती भाजपाच्या चिंतल यांनी मागितली हे भारीच झाले.
>सर्व रस्त्यांचे एरियल मॅपिंग होणार
या कामात शहरातील सर्व रस्त्यांचे एरियल मॅपिंग करण्यात येणार आहे. ड्रोन कॅमेºयाने वरून हे चित्रिकरण करण्यात येईल. त्यामुळे रस्त्याची लांबी, रूंदी त्यावरची दुकाने, अतिक्रमणे,याबरोबरच अन्य अनेक गोष्टींची माहिती केवळ एका क्लिकवर मिळणार आहे. योजना राबवण्यासाठी, कामे करण्यासाठी, म्हणून या सर्व गोष्टींचा उपयोग प्रशासनाला होत असल्याने जगभरात सर्वत्र रस्त्यांचे अशा पद्धतीने मॅपिंग केले जात असल्याचे जगताप यांनी सांगितले.