पुण्यात पालखी सोहळ्यासाठी ४ हजार पोलिसांचा फौजफाटा ; एसआरपीएफ, होमगार्डची पथके

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 12:53 PM2022-06-19T12:53:06+5:302022-06-19T12:53:34+5:30

यंदा वारी सोहळ्यात विक्रमी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता पालखी आगमनापासून ते प्रस्थानापर्यंत पोलिसांनी बंदोबस्ताची कडेकोट तयारी

4 000 police force for palakhi ceremony in Pune Squads of SRPF Homeguard | पुण्यात पालखी सोहळ्यासाठी ४ हजार पोलिसांचा फौजफाटा ; एसआरपीएफ, होमगार्डची पथके

पुण्यात पालखी सोहळ्यासाठी ४ हजार पोलिसांचा फौजफाटा ; एसआरपीएफ, होमगार्डची पथके

Next

पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दि. २२ जून रोजी पुण्यात येत असून पुणेपोलिसांनी बंदोबस्ताची चोख आखणी केली आहे. तब्बल चार हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.

कोरोना संसर्गामुळे गेली दोन वर्षे वारी होऊ शकली नाही. त्यामुळे यंदा वारी सोहळ्यात विक्रमी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता पालखी आगमनापासून ते प्रस्थानापर्यंत पोलिसांनी बंदोबस्ताची कडेकोट तयारी केली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक स्वतः बंदोबस्ताच्या प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवून आहेत.

दोन्ही पालख्यांचे २२ जूनला पुण्यात आगमन होणार असून २२ व २३ जून रोजी पुण्यात मुक्कामी असणार आहेत. दोन्ही पालख्या नियोजनानुसार भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर व नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिर येथे मुक्कामी असणार आहेत. याठिकाणीदेखील पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे.

साध्या वेशातील पोलिसांची गस्त

पालखी सोहळ्यात दर्शनासाठी होणाऱ्या गर्दीचा गैरफायदा सोनसाखळी चोरटे, मोबाईल चोरटे घेत असतात. हे गैरप्रकार रोखण्यासाठी ठिकठिकाणी साध्या वेशातील पोलिसांची गस्त असणार आहे. विशेषतः मुक्कामाच्या ठिकाणी पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. महिलांचा देखील पालखी सोहळ्यात मोठा सहभाग असतो. त्यामुळे साध्या वेशातील महिला पोलीस कर्मचारी त्याचबरोबर दामिनी मार्शलची पथके गस्तीवर ठेवण्यात आली आहेत. तसेच गुन्हे शाखेची पथकेही साध्या वेशात गस्त घालणार आहेत.

- वारकऱ्यांसाठी हेल्पलाईन, ठिकठिकाणी मदतीसाठी बुथ
- वॉच टॉवर उभारून त्याद्वारे खडा पहारा
- गर्दीच्या ठिकाणी बॅरिकेड्स
- पालखी मार्गावर आवश्यक तेथे सीसीटीव्ही यंत्रणा
- साध्या वेशातील पोलिसांची गस्त
- वाहतूक शाखेचा स्वतंत्र बंदोबस्त
- अन्न औषध प्रशासनाकडून वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थाची तपासणी
- पालखी सोहळा मार्गावर मौल्यवान वस्तू व सुरक्षिततेच्या सूचना देणारे फलक
- मार्गालगतच्या गल्ली-बोळात पोलिसांचे मोटारसायकल पेट्रोलिंग
- वैद्यकीय सुविधेबरोबर रुग्णवाहिकेची व्यवस्था

पालखी सोहळ्यासाठी शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पालखी मार्ग आणि मुक्कामाच्या ठिकाणी पोलिसांची गस्त राहणार असून शहर परिसरात विविध पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत. चेन स्नॅचिंग, पाकीटमारीच्या घटना रोखण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. पालखी कालावधीत वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले जाणार आहेत असे संदीप कर्णिक (सहपोलीस आयुक्त, पुणे शहर) यांनी सांगितले. 

Web Title: 4 000 police force for palakhi ceremony in Pune Squads of SRPF Homeguard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.