पुणे - सातारा महामार्गावरील सारोळा येथे पट्टेरी वाघाच्या कातड्याची विक्री करणारे ४ जण जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 08:05 PM2021-08-01T20:05:14+5:302021-08-01T20:05:26+5:30
गोपनीय माहितीच्या आधारे सारोळा उड्डाण पुलाखाली पोलिसांनी सापळा लावून वाघाच्या कातडी विक्रीसाठी आलेल्या चार व्यक्तींना हालचाली सुरू असताना ताब्यात घेतले.
नसरापूर : पुणे सातारा महामार्गावरील सारोळा येथील उड्डाण पुलाच्या खाली पट्टेरी वाघाचे कातडीची तस्करी करून विक्री करणारी टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाघाच्या कातडीसह मुद्देमाल ताब्यात घेऊन चार जणांना अटक केले आहे.
सातारा जिल्ह्यातील दिनेश अशोक फरांदे (वय ३८,रा.ओझर्डे), हसन रज्जाक मुल्ला (वय ३५,रा.ओझर्डे), गणपत सदू जुनगरे (वय ४५,रा.देवदेव पो.मामुर्डे) सुनील दिनकर भिलारे (वय ५२, रा.भिलार) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना गोपीनाय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, पुणे - सातारा रोडवर सारोळा ब्रीज खाली काही व्यक्ती पट्टेरी वाघाची कातडी तस्करी करून विक्री करण्यासाठी येणार आहेत. या माहितीच्या माहितीच्या आधारे सारोळा उड्डाण पुलाखाली पोलिसांनी सापळा लावून वाघाच्या कातडी विक्रीसाठी आलेल्या चार व्यक्तींना हालचाली सुरू असताना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून ४ फूट लांबीचे, दीड फूट रुंदीचे, वरच्या जबड्यात १३ दात व खालच्या जबड्यात १६ दात असे एका पट्टेरी वाघाचे कातडे, एक मोटारसायकल व ४ मोबाईल फोन असे एकूण ५ लाख २६ हजार १०० रूपये किमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आला. याबाबत नसरापूर वन विभागचे वन्य जीव रक्षक अधिकारी यांना माहिती देण्यात आली असून आले असून आरोपींना पुढील कारवाईसाठी राजगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.