नदीकाठ सुधार प्रकल्पामुळे पुण्यातील ४ पूल पाण्याखाली जाणार; मग कशाला प्रकल्प हवा? आदित्य ठाकरेंचा सवाल
By श्रीकिशन काळे | Published: February 25, 2024 03:19 PM2024-02-25T15:19:31+5:302024-02-25T15:31:45+5:30
पुणे मनपाच्या ५ हजार कोटी रुपयांच्या नदीकाठ सुधार प्रकल्पाची पर्यावरणीय मंजुरी राज्य सरकारने नाकारली आहे
पुणे : ‘‘ नदीकाठ सुधार प्रकल्पामुळे पुण्यातील चार पूल पाण्याखाली जाणार आहेत. मग कशाला असला नदीकाठ सुशोभीकरणाचा प्रकल्प हवा आहे? मुठा नदीमध्ये साबरमतीसारखा स्वीमिंग पूल का करायचा आहे? हा प्रकल्प तयार करताना किती पुणेकरांना विचारले गेले. स्थानिक जे लोक येथे राहत आहेत. त्यांना विचारले आहे का ? पावसाळ्यात नदी कशी वागते ? ही नदी साबरमतीसारखी आहे का ? हा सर्व विचार करणे अपेक्षित आहे. आता पुणेकरांनी निवडणूकीपूर्वी सर्व पक्षांना विचारावे की, पुण्याला वाचवणार की नाही?, असे आवाहन माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
पुणे मनपाच्या ५ हजार कोटी रुपयांच्या नदीकाठ सुधार प्रकल्पाची पर्यावरणीय मंजुरी राज्य सरकारने नाकारली आहे. तरी सुद्धा पुणे मनपाने बिनदिक्कतपणे या प्रकल्पाचे काम चालूच ठेवले आहे. या संदर्भात राजकीय पक्षांशी चर्चा करण्यासाठी सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना रविवारी सकाळी पुण्यात बैठकीला बोलावले होते. या बैठकीत ‘पुणे रिव्हर रिव्हायवल’ग्रुपचे विवेक वेलणकर, सारंग यादवाडकर यांनी नदीकाठ सुधार प्रकल्पाविषयी सादरीकरण केले. या वेळी ठाकरे बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले,‘‘आपली शहरं भकास होत आहेत. नदीकाठ सुधार हे शहरासाठी धोकादायक आहे. आता निवडणूक येत आहे. राजकीय पक्षाला बोलावून हे सादरीकरण दाखविले पाहिजे. सत्य परिस्थिती दाखवली पाहिजे. पुण्यात नदीकाठ सुधार झाले तर त्याचे काय नुकसान होणार आहे, ते सर्वांना सांगितले पाहिजे. आताच्या सत्ताधाऱ्यांनाही दाखवले पाहिजे. निवडणूकीत सर्वच पक्ष दारोदारी जात असतात. मतदान करा, असे सांगत असतात. त्यामुळे पुणेकरांनी हे आता निवडणूकीच्या तोंडावर बोलले पाहिजे,’’ असेही ठाकरे म्हणाले.
आयुक्त का भेटत नाहीत ?
आज स्थानिक स्वराज्य संस्था तशाच आहेत. तिथे निवडणूक झालेली नाही. आयुक्त देखील चार वर्षे झाले आहेत, बदलले नाहीत. पुण्यातही तशीच स्थिती आहे. स्थानिक नागरिकांना आयुक्त भेटत नाही. ते का भेटत नाहीत, याची मला माहिती नाही. पण त्यांनी नागरिकांना भेटायला हवे. नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी यापूर्वी रेडलाइन आणि ब्लू लाइन बदलल्या होत्या. हे धक्कादायक आहे, असे ठाकरे म्हणाले.
डॉ. सालिम अली पक्षी अभयारण्यात मी यापूर्वी भेट दिलेली होती. तेव्हा राडारोडा होता. तो काढून टाकण्याचा आदेश दिला होता. पण आमचं सरकार गेलं आणि तिथे पुन्हा राडारोडा टाकला गेला. आता तिथली अवस्थाही वाईट आहे. पुण्याची पार वाट लावली आहे, अशी खंतही ठाकरेंनी व्यक्त केली.