रक्षाबंधनाला एकाच दिवसात ४ घरफोड्या; लाखोंचा मुद्देमाल लंपास, भोर तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 08:58 PM2023-09-01T20:58:39+5:302023-09-01T20:58:50+5:30
घरफोड्या, दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढत असताना पोलिसांनी गस्त वाढवणे गरजेचे, नागरिकांचे म्हणणे
नसरापूर : रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून नसरापूर येथे चार जणांची बंद घरे फोडण्यात आली. राजगड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नसरापूर व केंजळ (ता. भोर) येथे घरफोडीच्या घटना घडल्या आहेत.येथील सह्याद्री गृहरचना सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने चोरट्यांना विरोध केला म्हणून त्यास चोरट्यांनी त्याला मारहाण करीता त्याचा हात मोडला आहे.
केंजळ येथील सागर शंकर भाटे व नसरापूर येथील चार घरफोडीच्या त्यापैकी इरफान हबीब मुलाणी, सतीश कडके, कुमार मोहिते व रोहिदास दळवी यांचे घरी चोरीच्या घटना घडल्या असल्याचे राजगड पोलिसांकडून सांगण्यात आले. मूळ गावठाणातील इरफान मुलाणी यांचे घरातून ६५ हजार त्यांच्याच शेजारी राहणारे व गावी गेलेले सतीश कडके यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून घरातील कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र व २० हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले.
कुमार मोहीते यांच्या कार्यालयातून कुलूप तोडून पाचशे रुपये चोरट्यांनी नेले. तर दळवी वस्तीतील रोहिदास दळवी यांच्या घरातील एक हजार चोरुन नेले.तर केंजळ येथील सागर शंकर भाटे यांचे घरातून ५३ हजाराचे दागिने चोरीस गेले आहेत. राहते बंद घराचे दरवाजाचे कडी कोयंडा कशाने तरी तोडून त्यावाटे आत प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने व इतर कागदपत्रे, ऐवज घरफोडी चोरी करून नेला असून गावातील शिवाजी भालघरे यांचा पाणी तापवण्याचा बंब चोरून नेला आहे.दरम्यान चोरट्याने सह्याद्री सिटी सोसायटीमध्ये प्रवेश करून सुरक्षारक्षकास मारहाण केली आहे. नसरापूरात आता घराफोड्या सुरु झाल्या असताना दुचाकी चोरण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नागरिक घाबरले असताना राजगड पोलिसांनी आपल्या गस्तीचे प्रमाण वाढवले पाहिजे असे नागरिकांचे म्हणणे आहे.