धानोरीत ४ दिवस विजेचा लपंडाव

By admin | Published: May 8, 2017 03:08 AM2017-05-08T03:08:35+5:302017-05-08T03:08:35+5:30

धानोरी परिसराला होणारा वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा शनिवार (दि. ६) वगळता सलग चौथ्या दिवशी रविवारीही (दि. ७) सुरू

4 days lightning hide | धानोरीत ४ दिवस विजेचा लपंडाव

धानोरीत ४ दिवस विजेचा लपंडाव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
येरवडा : धानोरी परिसराला होणारा वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा शनिवार (दि. ६) वगळता सलग चौथ्या दिवशी रविवारीही (दि. ७) सुरू होता. या भागाला होणारा वीजपुरवठा गुरुवारी (दि. ४) पहाटेपासून वारंवार खंडित होत आहे. यामुळे ऐन मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात नागरिकांचे हाल होत आहेत. शनिवारी दिवसभर सुरळीत असलेला वीजपुरवठा रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दोनदा खंडित झाल्याने नागरिकांना ‘शॉक’ लागला.
नगर रस्त्याकडून येणाऱ्या २२ केव्ही (किलोवॉट) क्षमतेच्या वीजवाहिनीतून धानोरी परिसराला वीजपुरवठा करण्यात येतो.
यासाठी नगर रस्त्याकडून येणाऱ्या
२२ केव्हीच्या वीजवाहिनीचे रूपांतर प्रत्येकी ११-११ केव्हीच्या वीजवाहिन्यांमध्ये करण्यात आले आहे. या भागात वीजग्राहकांची संख्या हजारो-लाखोंच्या घरात आहे.
या भागाचा झपाट्याने विकास होत असून अल्पावधीतच अनेक छोटे-मोठे गृहप्रकल्प, शाळा, रुग्णालये, उद्योगधंदे व प्लॉटिंगवर घरांची मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहेत.
गुरुवारी नगर रस्त्यावर मिलिटरीच्या बीआरडी स्टेशनजवळ कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कचरा जाळल्याने पहाटे दोनच्या सुमारास धानोरी परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या २२ केव्हीच्या वीजवाहिनीसह या वाहिनीच्या आजूबाजूला जमिनीत गाडलेल्या सर्वच छोट्यामोठ्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाला. त्यामुळे धानोरीसह खराडी, वडगावशेरी व इतर भागांचाही वीजपुरवठा गुरुवारी पहाटेपासून खंडित झाला.
महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ हालचाली करून खराडी व वडगावशेरीचा वीजपुरवठा ‘बॅक फिडिंग’ करून सुरळीत केला. धानोरीचा वीजपुरवठा संपूर्णपणे सुरळीत करण्यात मात्र महावितरणला गुरुवारी रात्रीचे बारा वाजले. त्यामुळे धानोरी परिसरातील नागरिकांचे गुरुवारी पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत वीजेअभावी चांगलेच हाल झाले. त्यानंतर शुक्रवारीही धानोरीत विजेचा लपंडाव सुरू होता.
शनिवारी मात्र धानोरीचा वीजपुरवठा सुरळीत राहिला.
रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास धानोरीचा वीजपुरवठा
दोनदा खंडित झाला.

अधिकारी "नॉट रिचेबल"
महावितरणचे धानोरी विभागाचे कनिष्ठ अभियंता संजय ओगले यांचा मोबाईल मागील ३-४ दिवस बंद असल्याने त्यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही. ओगले रजेवर असल्याने त्यांचा फोन बंद असल्याची माहिती विश्रांतवाडी केंद्राचे प्रमुख संजय घोडके यांनी शनिवारी दिली. घोडके यांचा मोबाईलही रविवारी बंद असल्याने त्यांचीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

नगर रस्त्यावर कचरा जाळल्याने वीजवाहिन्या जळाल्या व वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणने अथक परिश्रम करून वीजपुरवठा सुरळीत केला. रस्त्याची खोदाई, कचरा जाळताना व इतर कामांमध्ये महावितरणच्या वीजवाहिन्या जमिनीखाली आहेत का, याची खात्री नागरिकांनी करावी. रस्त्याच्या खोदाईसारखी कामे करताना महावितरणला सूचना दिल्यास जागेची पाहणी करून जमिनीखाली वीजवाहिन्या कुठे आहेत, हे समजू शकते. मात्र अनेक वेळा पालिकेचे ठेकेदार कामे उरकण्याच्या नादात महावितरणला न कळवताच रस्त्याची खोदाई करतात आणि यामुळे अनेक वेळा जमिनीखालच्या वीजवाहिन्या नादुरुस्त होतात. पालिका व नागरिकांच्या या बेपर्वाईचा त्रास मात्र महावितरणचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सहन करावा लागतो.
- जयश्री मालवकर, सहायक अभियंता, महावितरण

Web Title: 4 days lightning hide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.