चित्रपटातील आकर्षणाने ४ मुली पोहचल्या थेट मुंबईत; वारजे येथून गेल्या होत्या निघून
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 04:31 PM2021-01-12T16:31:34+5:302021-01-12T16:31:50+5:30
लॉकडाऊन काळात घरात बसून मोबाईलवर चित्रपट पाहताना मुंबईचे आकर्षण निर्माण झाले.
पुणे : लॉकडाऊनच्या काळात मोबाईलवर पाहिलेल्या चित्रपटातून निर्माण झालेले आकर्षण व शाळा बंद असल्याने घरात बसून होत असलेला वाद या कारणामुळे एकाच वेळी वारज्यातील ४ अल्पवयीन मुली घरातून पळून गेल्याने एकच खळबळ उडाली होती. वारजे पोलिसांनी घेतलेल्या शोधात या मुली मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे सापडल्या. रविवारी दुपारी ४ पासून सुरु झालेला शोध सुमारे ८ तासांच्या शोधानंतर रात्री साडेबारा वाजता या मुली सापडल्याने सर्वांनीच नि:श्वास सोडला.
याबाबत वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन काळात घरात बसून मोबाईलवर चित्रपट पाहताना मुंबईचे आकर्षण निर्माण झाले. त्यातच घरातील लोकांबरोबर घरात बसून असल्याने होत असलेला राग राग यामुळे एकाच इमारतीत राहणार्या या १२ ते १४ वर्षाच्या मुली रविवारी दुपारी घरातून निघून गेल्या. त्यामुळे वारजे येथील म्हाडा वसाहतीतील एकच खळबळ उडाली. त्यांच्या पालकांनी वारजे पोलिसांकडे धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी यातील गांभीर्य लक्षात घेऊन मुलींचा तपास करण्याचे आदेश दिले. मुलींचे मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केल्यावर त्या स्वारगेट येथे गेल्याचे लक्षात आले. स्वारगेट बसस्थानकांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर त्या मुंबईला जाणाऱ्या बसमध्ये बसल्याचे दिसून आले. त्यांनी पनवेलला बसमधून उतरुन दुसर्या बसने त्या दादरला गेल्या. तेथून त्या टॅक्सी करुन छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनल येथे पोहचल्या. वारजे पोलिसांना त्यांचे लोकेशन मिळताच पोलिसांनी ही बाब लोहमार्ग पोलिसांना कळविली. पोलिसांनी रेल्वे स्टेशनच्या परिसरात शोध घेतला असताना तेथे या मुली आढळून आल्या. त्यांनी मुलींना पोलीस ठाण्यात आणले. सहायक पोलीस निरीक्षक रामदास शेवते, पोलीस उपनिरीक्षक मनोहर भोईणे व त्यांचे सहकारी तातडीने मुंबईला गेले व त्यांनी मुलींना ताब्यात घेऊन पुण्यात आणले.
घरातून निघून जाण्याबाबत विचारले असताना या मुलींनी सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात घरी बसून मोबाईलवर पाहिलेल्या चित्रपटामुळे मुंबईचे आकर्षण निर्माण झाले. त्यात सतत घरात असल्याने होत असलेला वाद या कारणावरुन या मुली घरातून एकत्रितपणे निघून गेल्या होत्या. मुंबईला जाण्यासाठी त्यांनी घरातून साधारण ४ हजार रुपये घेतले होते. मुंबई जाऊन कामधंदा करायचा त्यांचा विचार होता. पोलिसांनी तातडीने केलेल्या हालचालीमुळे या मुली कोणाचे सावज न ठरता सुखरुपपणे घरी परतले.