भीमा नदीकाठच्या कृषिपंपांना ४ तास वीज
By admin | Published: April 11, 2016 12:45 AM2016-04-11T00:45:05+5:302016-04-11T00:46:13+5:30
दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना भामा आसखेडचे पाणी पोहचण्यासाठी शिरूर-हवेलीतील विद्युत पंपांची वीज जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बंद करण्यात आली होती.
कोरेगाव भीमा : दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना भामा आसखेडचे पाणी पोहचण्यासाठी शिरूर-हवेलीतील विद्युत पंपांची वीज जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बंद करण्यात आली होती. मात्र शिरूर-हवेलीतील पिके जळू लागल्याने दररोज चार तास वीज सुरू करण्याची मागणी केल्यानंतर सोमवारपासून (दि. ११) पासून चार तास वीजपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे, असे आमदार पाचर्णे यांनी सांगितले. या निर्णयामुळे भीमा नदीकाठचा शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
दौंड तालुक्यतील पिके जळू लागल्याने भामा-आसखेडचे भीमा नदीपात्रात २८ मार्चपासून ९०० घनफूट प्रतिसेकंद पाणी सोडण्यात आले. मात्र, हे पाणी शिरूर-हवेली तालुक्याच्या पुढे गेलेच नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी भीमा नदीकाठच्या विद्युत पंपांचा वीजपुरवठा बंद करण्याचे आदेश १ एप्रिल रोजी दिल्यानंतरही वीजपुरवठा चालूच होता. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच महावितरणने विद्युत पंपांची वीज बंद केली. मात्र, वीज बंद करण्याच्या काही तासांतच पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, वढू बुद्रुक, कोरेगाव भीमा, शेरीवस्ती व हवेली तालुक्यातील पेरणे, वढू खुर्द, डोंगरगाव, बुर्केगाव, पिंपरी सांडस, न्हावी सांडस, सांगवी सांडस याठिकाणचे विद्युत पंप शनिवारी सायंकाळी व रविवारी सकाळी सुरू असल्याने हा वीजपुरवठा महावितरणच्या हलगर्जीपणामुळे सुरू असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले आहे.
याबाबत पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता, वीज कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरू असल्याबाबत आम्हाला काहीच माहिती नसल्याचे सांगितल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला अजूनही महावितरण केराची टोपलीच दाखवीत आहे. (वार्ताहर)
शेतीपंपांना आठ तास वीज देण्याची मागणी
इंदापूर : उजनी धरणाच्या मूळ सिंचन आराखड्यातील हक्काचे दहा टीएमसी पाणी प्रकल्पग्रस्तांना मिळावे, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणलोट क्षेत्रातील शंभर गावांचा शेतीपंपांचा दोन तासांवर आणलेला वीजपुरवठा आठ तास करावा, या प्रमुख मागण्यांसाठी तालुका काँग्रेस कमिटी व उजनी धरणग्रस्त संवर्धन समितीच्या वतीने रविवारी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या डोंगराई येथील बाह्यवळण रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
दौंड तालुक्यातील सोनवडी बंधाऱ्यापर्यंत पाणी गेले असून, भीमा नदीपात्रात बेसुमार वाळू उपशामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे व वाळूच्या ढिगाऱ्यांमुळे पाणी पोहोचण्यास विलंब होत आहे. खोरवडी, देऊळगावराजे, पेडगाव बंधाऱ्यापर्यंत पाणी तीन-चार दिवसांत पोहोचेल, तरी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे.
- ए. डी. संकपाळ,
शाखाधिकारी, पाटबंधारे विभाग