नायजेरियनकडून ४ लाखांचे कोकेन हस्तगत,मिलिटरी इंटेलिजेंसकडून मिळाली होती टीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 09:00 PM2021-07-28T21:00:47+5:302021-07-28T21:02:20+5:30
अमली पदार्थ विरोधी पथकाने बाणेर येथील मित्रनगर कॉलनीतील सार्वजनिक रोडवर सापळा लावला.
पुणे : मिलिटरी इंटेलिजेंसकडून मिळालेल्या माहितीवरुन अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका नायजेरियनला पकडून त्यांच्याकडून ४ लाख रुपयांचे २० ग्रॅम १६० मिलीग्रॅम कोकेन हस्तगत केले आहे.
शुएब तौफिक ओलाबी (वय ४०, रा़ झु व्हिलेज, वाशी, नवी मुंबई, मुळ रा. नायजेरिया) असे त्याचे नाव आहे. सदन कमांड येथील मिलिटरी इंटिलिजीन्सकडून पुणेपोलिसांना नायजेरियनविषयी माहिती मिळाली होती. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने बाणेर येथील मित्रनगर कॉलनीतील सार्वजनिक रोडवर सापळा लावला. तेथे आलेल्या शुएब ओलाबी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून विक्रीसाठी आणलेले ४ लाख ३ हजार २०० रुपयांचे २० ग्रॅम १६० मिलीग्रॅम कोकेन दोन मोबाईल, नायजेरिया देशाचा पासपोर्ट, रिकाम्या प्लास्टिकच्या २२ पिशव्या, टिक्सोटेप असा माल जप्त करण्यात आला.
सहायक पोलीस उपनिरीक्षक सुजित वाडेकर यांच्या फिर्यादीवरुन चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने अधिक तपासासाठी आरोपीची ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक डी़ एल़ चव्हाण अधिक तपास करीत आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड व त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली़.