हेल्मेटसक्ती मोहिमेत ४ लाखांचा दंड वसूल
By admin | Published: February 5, 2016 02:24 AM2016-02-05T02:24:40+5:302016-02-05T02:24:40+5:30
‘हेल्मेटसक्ती’ आणि वाद हे पुणेकरांच्या दृष्टीने नवीन नाही. परंतु परिवहनमंत्री दिवाकर रावतेंनी पुण्यामध्ये हेल्मेटसक्ती राबवणार अशी घोषणा करताच वाहतूक पोलीस बाह्या
पुणे : ‘हेल्मेटसक्ती’ आणि वाद हे पुणेकरांच्या दृष्टीने नवीन नाही. परंतु परिवहनमंत्री दिवाकर रावतेंनी पुण्यामध्ये हेल्मेटसक्ती राबवणार अशी घोषणा करताच वाहतूक पोलीस बाह्या सरसावून रस्त्यावर उतरले आहेत. वाहतूक पोलिसांनी गुरुवारी दिवसभरात तब्बल ४ हजार ७१७ दुचाकीचालकांवर हेल्मेट कारवाई करीत तब्बल ४ लाख ७६ हजार ९00 रुपयांचा दंड वसूल केला. बुधवारच्या तुलनेत हा आकडा तब्बल तीन हजारांनी वाढला आहे. दिवसभरात पुणेकरांचा मात्र वाहतूक पोलिसांसोबत वाद होत होते.
बुधवारी रावते यांनी औरंगाबादपाठोपाठ पुण्यामध्ये हेल्मेट सक्ती राबवणार असल्याची घोषणा केली होती. औरंगाबाद शहरामध्ये हेल्मेटसक्ती राबवण्यात येत आहे. त्यासाठी एक महिन्याभरापासून जनजागृतीवर भर देण्यात आला होता. रावते यांच्या हस्ते हेल्मेट वापरणाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. पुण्यामध्ये हेल्मेट घालणे आणि न घालणे यावरून कायमच वाद रंगत आलेला आहे. वाहतूकविषयक काम करणाऱ्या सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनी कायमच हेल्मेट सक्तीचा विरोध केला आहे. त्यामुळे पोलिसांनी वेळोवेळी हेल्मेटसक्ती करण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. वाहतूक पोलिसांवर होणाऱ्या टीकेमुळे कारवाई थंडावली होती. हेल्मेट कारवाई विशेष मोहिमेद्वारे राबवली जात होती. मात्र, परिवहन मंत्र्यांनीच याची घोषणा केल्यामुळे वाहतूक पोलिसांनी गुरुवारी हेल्मेट कारवाईला सुरुवात केली. पोलिसांसोबत दुचाकीचालकांचे वाद होताना दिसत होते. वाहनचालकांनी पोलिसांची ही कारवाई म्हणजे दांडगाई असल्याची टीकाही केली. पोलिसांनीही दिवसभरात ४ हजार ७१७ वाहनचालकांवर कारवाई करीत हेल्मेट कारवाई तीव्र केल्याची झलक दाखवून दिली आहे. ही कारवाई यापुढे आणखी तीव्र करणार असल्याचे वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड यांनी सांगितले आहे.