Pune Porsche Accident: अग्रवालकडून मिळाले ४ लाख; १ लाखाचा हिशोब लागेना, डॉ. तावरेभोवती चौकशीचा फेरा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 12:38 PM2024-08-09T12:38:25+5:302024-08-09T12:39:15+5:30

ससूनच्या डॉ हळनोर आणि डॉ तावरे यांना संबंधिताकडून मोठा लाभ झाल्याचे तपासात निष्पन्न

4 lakh received from vishal Aggarwal family 1 lakh without calculation Dr ajy tawre round of inquiry around the tower | Pune Porsche Accident: अग्रवालकडून मिळाले ४ लाख; १ लाखाचा हिशोब लागेना, डॉ. तावरेभोवती चौकशीचा फेरा

Pune Porsche Accident: अग्रवालकडून मिळाले ४ लाख; १ लाखाचा हिशोब लागेना, डॉ. तावरेभोवती चौकशीचा फेरा

पुणे : कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणातील मास्टरमाईंड समजला जाणारा, तसेच रक्ताचे नमुने बदलण्याच्या प्रक्रियेत पोलिसांच्या तपासात मुख्य सूत्रधार म्हणून निष्पन्न झालेला ससून रुग्णालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचा तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे याची पुन्हा एकदा चौकशी करण्यात येणार आहे. येरवडा कारागृहात जाऊन डॉ. तावरेची चौकशी करण्याची परवानगी गुन्हे शाखेला मिळाली आहे. याला वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीदेखील दुजोरा दिला आहे.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोन आठवड्यांपूर्वी ९०० पानांचे दोषारोपपत्र दाखल झाले होते. अल्पवयीन मुलाने अपघात केल्यापासून त्याला वाचवण्यासाठी कुटुंबातून तसेच ससून रुग्णालयाच्या पातळीवर अपघात करणाऱ्या अल्पवयीन मुलाचेच रक्त बदलण्यात आले. यामध्ये बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याच्या सांगण्यावरून त्याचा बांधकाम व्यावसायिक मित्र याने निवृत्त सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्याच्या मदतीने डॉ. तावरेची ओळख काढली होती. त्यानंतरच आर्थिक लाभापोटी डॉ. तावरे याच्या सांगण्यावरून डॉ. श्रीहरी हाळनोर याने अपघात करणाऱ्या अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांचेही रक्त बदलले होते. तर डॉ. हाळनोर याला २ लाख ५० हजार तर घटकांबळे याला ५० हजार रूपये मिळाले होते. यात अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड यांची भूमिका महत्त्वाची होती. तर विशाल अग्रवालची पत्नी शिवानी हिचे रक्त अल्पवयीन मुलाचे रक्त म्हणून तपासणीसाठी देण्यात आले होते. हे तपासात निष्पन्न झाले आहे.

न्यायिक प्रक्रियेतून बेकायदेशीररीत्या सोडवणे, महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यासाठी पुरव्यांशी छेडछाड करणे, न्यायदानाच्या प्रक्रियेत बाधा आणण्यासाठी तपास यंत्रणांची दिशाभूल केली. त्यासाठी बनावटीकरण केले. डॉ. हाळनोर रक्त नमुने बदलण्याची जेवढा जबाबदार आहे, तेवढाच रक्त बदलण्यास सांगणारा डॉ. तावरेही जबाबदार असल्याचा ठपका या प्रकरणात ठेवण्यात आला आहे. तर अग्रवाल कुटुंबियांकडून चार लाख रूपये देण्यात आले होते. घटकांबळे याला त्यातील तीन लाख देण्यात आले होते. त्यातील एक लाखाचा हिशोब पोलिसांना लागत नसल्याने त्याचा तपास डॉ. तावरेकडे करायचा आहे. पोलिसांकडून ठेवण्यात आलेल्या ठपक्यामध्ये त्यांनी डॉ. तावरेचा गुन्ह्यात प्रत्यक्ष व सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याचे म्हटले आहे. त्याला यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ झाला असून इतर स्वरूपाचा मोठा लाभ संबंधिताकडून देण्याची हमी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याच्या दृष्टीने व डॉ. तावरे याच्यासह अन्य आरोपींकडून मिळालेली माहिती याचे धागेदोरे जुळवण्यासाठी गुन्हे शाखेकडून तावरेची कारागृहात जाऊन चौकशी करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती. गुन्हे शाखेला तपासासाठीही परवानगी मिळाली आहे.

Web Title: 4 lakh received from vishal Aggarwal family 1 lakh without calculation Dr ajy tawre round of inquiry around the tower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.