पुण्यात ४० लाख झाडे; ८ लाखांनी आणखी वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:11 AM2021-05-11T04:11:13+5:302021-05-11T04:11:13+5:30
राजू इनामदार लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील वृक्षसंख्येने ४८ लाखांचा टप्पा गाठला आहे. यातील ४० लाख वृक्षांची १६ ...
राजू इनामदार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील वृक्षसंख्येने ४८ लाखांचा टप्पा गाठला आहे. यातील ४० लाख वृक्षांची १६ प्रकारांंनी संगणकीय नोंद झाली असून, आणखी ८ लाख वृक्षांच्या नोंदीचे काम सुरू आहे.
सहकारनगर, कात्रज, बिबवेवाडी, येरवडा या उपनगरांमध्ये वृक्षांची संख्या काही लाखांत आहे. कसबा, भवानी पेठ, रास्ता, नाना, तसेच अन्य मध्यभागात ही संख्या काही हजारांमध्ये आहे. शहरातील सर्वाधिक वृक्ष सहकारनगर परिसरात आहे. धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक म्हणजे १० लाख १५ हजार १४४ वृक्ष आहेत. सर्वांत कमी म्हणजे १२ हजार ४७४ वृक्ष भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत. महापालिकेच्या उद्यान विभागाने खासगी कंपनीच्या साह्याने वृक्षगणना केली. यात वृक्षाचे प्रचलित नाव, शास्त्रीय नाव, पाने, फुले, फळ, ठिकाण, वय, मालकी अशा १६ मुद्यांची नोंद घेण्यात आली आहे. आणखी ८ लाख वृक्षांची नोंद घेतली जात आहे.
आंबा, वड, पिंपळ, अशा दिवसा जास्त प्राणवायू सोडणाऱ्या देशी वृक्षांची संख्या यात कमी आहे. गिरिपुष्प झाडांची संख्या ९ लाख १९ हजार आहे. कडुलिंबाची झाडे १ लाख ९ हजार ३८५ आहे. आंब्याची झाडे ७३ हजार ८५२ आहेत.
चौकट
देशी वृक्ष व त्यातही वड, पिंपळ अशी आकाराने मोठी व दाट पाने असलेल्या झाडांची लागवड मोठ्या संख्येने करायला हवी. हे वृक्ष जास्त ऑक्सिजन सोडतात. मानवाला हानीकारक कार्बन शोषून घेतात.
डॉ. हेमा साने- वनस्पती तज्ज्ञ
चौकट
“परदेशी झाडांची संख्या काही वर्षांत वाढली असल्याचे निरीक्षण आहे. ‘देशी झाडे लावा, परदेशी वृक्ष लागवड करू नका,’ असे आवाहन वृक्षतज्ज्ञ सातत्याने करत असतात. तरीही दिसण्याच्या आकर्षणापोटी परदेशी वृक्षांची लागवड वाढताना दिसते.
योगेश कुटे, वृक्षगणना करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी