बेशिस्त वाहनचालक ‘ई’ जाळ्यात, सीसीटीव्ही अन् ई-चलनच्या माध्यमातून ४ महिन्यांत सव्वाआठ कोटींचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 06:47 AM2017-08-30T06:47:28+5:302017-08-30T06:47:34+5:30
क्लोज सर्किट टीव्हीच्या जाळ्यात अडकलेले बेशिस्त वाहनचालक आणि थेट कारवाई करून ई-चलनच्या माध्यमातून दंड केलेल्या वाहनचालकांकडून अवघ्या चार महिन्यांतच ८ कोटी २४ लाख ९७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पुणे : क्लोज सर्किट टीव्हीच्या जाळ्यात अडकलेले बेशिस्त वाहनचालक आणि थेट कारवाई करून ई-चलनच्या माध्यमातून
दंड केलेल्या वाहनचालकांकडून अवघ्या चार महिन्यांतच ८ कोटी २४ लाख ९७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तब्बल ३ लाख ५ हजार ८११ वाहनचालकांवर ही कारवाई करण्यात आली. शहर आयुक्तालयाच्या आखत्यारीतील ई-चलन सुरू झाल्यापासून मार्च २०१७ ते २०
जुलैअखेरीस सरासरी दरोरज अडीच हजार वाहनचालकांवर कारवाई होत असल्याचे दिसून येत आहे. सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंग न पाळणे, हेल्मेट नसणे, कागदपत्र अपुरी असणे, प्रदूषण चाचणी केल्याचे प्रमाणपत्र नसणे अशा विविध नियमभंगाच्या प्रकरणांचा यात समावेश आहे.
केंद्र सरकारने डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून शहरातदेखील ई-चलन यंत्रे पोलीस वाहतूक विभागाला पुरविण्यात आली आहेत.
1 या ई-चलन यंत्राद्वारे २९ मार्च ते ३० जुलै २०१७ अखेरपर्यंत ८ कोटी २४ लाख ९७ हजार ९३० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यात १ लाख ७१ हजार ७०३ वाहनचालकांकडून तत्काळ ३ कोटी ८६ लाख ८५ हजार ८२५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर, कारवाई झाल्यानंतर १ लाख ३४ हजार १०८ वाहनचालकांकडून ४ कोटी ३८ लाख १२ हजार १०५ रुपये दंड वसूल करण्यात आला.
2याशिवाय, २०१६मध्ये ४६६ आणि २०१७मध्ये जुलैअखेर ३०१ जणांवर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणे आणि बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीप्रकरणी हे खटले दाखल करण्यात आले असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड यांनी दिली. माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी ही बाब समोर आणली आहे.
शहरात ३१२ ठिकाणी वाहतूक विभागाने सीसीटीव्ही बसविलेले असून, त्या माध्यमातूनही बेशिस्त वाहनचालकांना वाहतुकीचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठविण्यात येते. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बेशिस्त वाहनचालक दंडाच्या कक्षेत आले आहेत.
४सीसीटीव्हीमुळे बहुतांश बेशिस्त वाहनचालक दंडास पात्र ठरले असल्याचे
वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.