पुणे जिल्ह्यात पावसाचे ४ बळी; खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून तीन बहीण-भावांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 10:01 AM2022-07-13T10:01:12+5:302022-07-13T10:05:02+5:30
आळंदीत इंद्रायणी नदी दुथडी...
पुणे : पाण्यात खेळत असताना अंदाज न आल्याने, घराजवळील शेतातील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून तीन सख्या बहीण-भावाचा मृत्यू झाला. चाकणजवळील आंबेठाण येथे मंगळवारी सकाळी ही घटना घडली. तिन्ही मुले ४ ते ८ वयोगटांतील आहेत. दुसरी घटना दत्तवाडी येथे घडली असून, विजेच्या तारांचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू झाला.
आंबेठाण येथील घटनेत रोहित जयकिशन दास (वय ८), राकेश जयकिशन दास (वय ६) आणि श्वेता जयकिशन दास (वय ४) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.
पुण्यात दत्तवाडी येथे मंगळवारी महावितरणची लघुदाब वाहिनी तुटून रस्त्यावर पडली हाेती. ही तार हटविण्याचा प्रयत्नात उर्वरित दोन फेजच्या तारांमधील वीज लोंबळकणाऱ्या तारेत प्रवाहित झाली आणि त्याचा धक्का बसून एका तरुणाचा मृत्यू झाला, तसेच शहरातील नाना पेठेत बांधकाम सुरू असलेल्या दुकानाची भिंत कोसळून एक जण जखमी झाला. दुमजली वाड्यातील घराची भिंत कोसळून दोघे जण जखमी झाले होते.
पावसामुळे तुटून खाली पडलेल्या विद्युत वाहिनीचा धक्का लागून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रोहित संपत थोरात (वय २०, रा.भंडारी हॉटेलच्या मागे चाळीत) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना सिंहगड रस्त्यावरील गणेशमळा भंडारी हॉटेलसमोर मंगळवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास घडली.
आळंदीत इंद्रायणी नदी दुथडी
पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात गेले काही दिवस जोरदार पाऊस पडत असून, त्यात कळमोडी, चिल्हेवाडी ही धरणे भरली आहेत. अनेक धरणांतील पाणीसाठा ५० टक्क्यांवर आला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पात मंगळवारी सायंकाळपर्यंत ३९ टक्के पाणीसाठा झाला आहे. यात एकूण ११.५७ टीएमसी पाणी जमा झाले आहे.
खडकवासला धरण १०० टक्के भरले असून, मंगळवारी सायंकाळी धरणातून १३ हजार १४२ क्युसेक पाण्याचा विसर्ग मुठा नदीत साेडण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. नदीपात्रात अनेक जण आपल्या गाड्या पार्क करतात. नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात या गाड्या अडकल्या आहेत. आळंदी येथे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असून, नदी काठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.