४ हजार ८९६ पोलीस यंदा पोस्टल मतदान करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 10:16 PM2019-04-22T22:16:07+5:302019-04-22T22:17:49+5:30
यंदा ४ हजार ८९६ पोलीस पोस्टल मतदान करणार आहेत.
पुणे : रस्त्यावरील बंदोबस्तात अडकलेल्या हजारो पोलिसांना पोस्टल मतदानासाठी फॉर्म भरुन देणे, तो आल्यानंतर तो भरणे व पुन्हा संबंधित केंद्रात जाऊन देणे यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने आजवर असंख्य पोलीस कर्मचारी मतदानापासून वंचित राहिले होते. यंदा मात्र सुरुवातीपासूनच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे यंदा ४ हजार ८९६ पोलीस पोस्टल मतदान करणार आहेत.
पोलीस आयुक्त डॉ़. के. व्यंकटेशम यांनी पोस्टल मतदानासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास भोसले यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करुन त्यांच्यावर सर्व जबाबदारी सोपविली होती. त्यांनी उपजिल्हाधिकारी सुनिल गाढे यांनी पोलीस आयुक्तालयात सर्व पोलीस ठाण्याचे प्रशासन अधिकाऱ्यांना पोस्टल मतदानावर प्रशिक्षण दिले. पॉवर पाॅईंट प्रेझेंटेशन दिले. त्यामुळे सर्व पोलीस ठाण्यातील पोलिसांचे मतदार यादीतील क्रमांक घेऊन फॉर्म १२ मागविण्यात आले. व पुणे शहर पोलीस दलातील २ हजार ६९१ पोलिसांनी हे फॉर्म भरुन दिले आहेत. तसेच बाहेरुन आलेले २ हजार २०५ पोलीस कर्मचाऱ्यांनी मतदानासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली असून त्यांच्यापर्यंत मतपत्रिका पोहचविण्यात येत आहे. या शिवाय आपली ड्युटी संभाळून २ हजार ४२ पोलीस मतदान करणार आहेत. मागील काही निवडणुकांमध्ये मतदान करु न शकलेल्या पण यंदा मतदान करण्याची इच्छा असलेल्या १ हजार ७५१ पोलिसांची नावे मतदार यादीत आढळून आली नाही़. त्यांचा नावाचा शोध घेण्यात येत आहे. इतक्या मोठ्या संख्येने प्रथमच जवळपास ८० टक्क्यांपर्यंत पोलीस यंदा मतदान करणार आहेत.