धरणातील ४ टीएमसी पाणी महिन्यात संपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:11 AM2021-03-31T04:11:35+5:302021-03-31T04:11:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगरपालिका परिसर व जिल्ह्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पात सध्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महानगरपालिका परिसर व जिल्ह्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पात सध्या १६.३८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धारण साखळी प्रकल्पात केवळ ३ टक्के पाणीसाठा अधिक आहे. तसेच एका महिन्यात तब्बल ४ टीएमसी पाणी कमी झाले आहे. महिन्यातच एवढे पाणी गेले कुठे, असा प्रश्न यातून निर्माण झाला आहे.
खडकवासला धरण साखळी प्रकल्पातून पुणे शहराला पिण्यासाठी, औद्योगिक कंपन्यांना वापरासाठी आणि शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो. पुणे महानगरपालिकेकडून दरवर्षी अधिक पाण्याचा वाढता वापर केला जातो, अशी ओरड जलसंपदा विभागाकडून केली जाते. पुण्यातील नागरिकांना पिण्यासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध व्हावा यासाठी काहीवेळा शेतीसाठी सोडले जाणारे आवर्तन रद्द केले जाते किंवा आवर्तनाच्या कालावधी कमी केला जातो. परंतु, यंदा वरूणराजाने चांगली कृपादृष्टी दाखवल्याने जिल्ह्यातील बहुतांश धरणे शंभर टक्के भरली. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतीसाठी मुबलक पाणी सोडण्यात आले आहे.
खडकवासला धरण साखळी प्रकल्पातून दौंड, बारामती, यवत आदी भागाला २० फेब्रुवारी रोजी आवर्तन सोडले. धरणातून सोडण्यात आलेले पाणी अजूनही सुरू असून आणखी ५ ते ६ दिवस हे आवर्तन सुरु राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच येत्या १५ एप्रिलपासून आणखी एक आवर्तन सोडण्याचा विचार जलसंपदा विभागाकडून केला जात आहे. त्यामुळे धरणातील उपलब्ध पाणीसाठा पुढील काही दिवसात चांगलाच कमी होणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.
चौकट
महिन्यात ४ टीएमसी पाणीसाठा संपला
खडकवासला धरण साखळी प्रकल्पात २८ फेब्रुवारीला २०.३७ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध होता. तर ३० मार्चला धरणात १६.३८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे एका महिन्यात ४ टीएमसी पाणीसाठा कमी झाला. खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील धरणांमध्ये खऱ्या अर्थाने जुलै महिन्यात पावसाचे पाणी साठवण्यास सुरुवात होते. त्यामुळे प्रत्येक महिन्याला ४ टीएमसी पाणीसाठा कमी झाल्यास पुणेकरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
चौकट
धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा
खडकवासला : ०.९४ टीएमसी
टेमघर : ०.४६ टीएमसी
वरसगाव : ७.४१ टीएमसी
पानशेत : ७.५७ टीएमसी
चौकट
मागील वर्षी खडकवासला धरण प्रकल्पात ५३.११ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. तर यंदा ५६.१८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे धरणात मागील वर्षाच्या तुलनेत केवळ ३ टक्के पाणीसाठा अधिक आहे.तसेच मागील वर्षी ३० मार्च रोजी धरण प्रकल्पात एकूण १५.४८ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध होता.