Pune: महापालिकेच्या ड्रेनेजचे काम सुरु असताना वायरी उघड्यावर; विजेच्या धक्क्याने ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 02:07 PM2022-03-04T14:07:24+5:302022-03-04T14:08:08+5:30
पुणे : उघड्यावरील विजेच्या वायरला धक्का बसून एका ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना कोंढव्यातील मिठानगर परिसरात बुधवारी दुपारी ...
पुणे : उघड्यावरील विजेच्या वायरला धक्का बसून एका ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना कोंढव्यातील मिठानगर परिसरात बुधवारी दुपारी अडीच वाजता घडली. शहजाद अमीर सय्यद (वय ४, रा. नवाझिश पार्क, मिठानगर, कोंढवा) असे मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे.
या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी खोदकाम करणारे ठेकेदार, महावितरणचे अधिकारी, अभियंता, तसेच वायरमन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहजादचे वडील अमीर शौकत सय्यद यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: शहजाद हा बुधवारी दुपारी अरेबिक भाषेच्या शिकवणीसाठी गेला होता. मात्र, शिकवणीला सुट्टी असल्यामुळे तो घरी परत येत होता. नवाझिश चौक ते कुबा मस्जिद रोडवर ड्रेनेजचे काम सुरू होते. त्यासाठी रस्ता खोदण्यात आला होता. त्याच्या बाजूला फिडरचा पिलर होता. त्यामधील काही वायरी बाहेर आलेल्या होत्या. त्यातील एक वायर कट झाल्यामुळे ती खाली पडली होती. शहजाद हा तेथून जात असताना त्याचा या वायरीला स्पर्श झाल्याने त्याला विजेचा धक्का बसला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
याबाबत अमीर सय्यद यांनी सांगितले की, महापालिकेच्या ड्रेनेजचे काम सुरू होते. त्यावेळी तेथे उघड्यावर वायरी पडल्या होत्या. तेथे कोणीही नव्हते. तसेच कोणताही फलक लावण्यात आला नव्हता. अमीर सय्यद यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी सांगितले.