४ वर्षीय भाचीवर मानलेल्या भावाचा लैंगिक अत्याचार; मुंढव्यातील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 02:51 PM2024-10-14T14:51:19+5:302024-10-14T14:51:34+5:30
नराधम ३ वर्षाच्या मुलीला घेऊन जात असताना मोठ्या मुलीने विरोध केला तरी त्याने ऐकले नाही
पुणे : मानलेल्या भावानेच ४ वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी एका ३५ वर्षाच्या नराधमावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार घोरपडी येथील दुर्गा माता मंदिराशेजारी व ताराबाग सोसायटीजवळ, रेल्वे लाईनच्या बाजूला रविवारी (दि. १३) सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास घडला आहे. पीडित मुलीच्या आईने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आरोपी नराधमाला भाऊ मानत होत्या. त्यामुळे त्याचे घरात जाणे येणे होते. रविवारी सकाळी फिर्यादी व त्यांचे पती घरात नसल्याचा फायदा घेऊन तो घरी आला. फिर्यादी यांची ३ वर्षे १० महिन्याच्या मुलीला फुस लावून आपल्याबरोबर घेऊन जाऊ लागला. तेव्हा त्यांच्या मोठ्या मुलीने त्याला विरोध केला. तरीही त्याने या मुलीला घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवले. तेथेच पिडित मुलीच्या आईची फिर्याद घेण्यात आली. आरोपी हा सध्या फरार असून, मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निळकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली २ पथके आरोपीचा शोध घेत आहेत.