एसटीत नोकरीच्या भरवशावर ४ वर्षे वाया गेली; पुणे विभागातील उमेदवार परत आंदोलनाच्या पवित्र्यात
By नितीश गोवंडे | Published: May 10, 2023 05:27 PM2023-05-10T17:27:57+5:302023-05-10T17:29:01+5:30
दिलेल्या शब्दाची पूर्तता न झाल्यामुळे ३०० उमेदवार परत १५ मे पासून आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषणास बसणार
पुणे : चार वर्षांपासून पुणे एसटी विभागाची रखडलेली भरती सुरू करण्यासाठी पुणे विभागातील पात्र उमेदवार दुसऱ्यांदा आझाद मैदानावर उपोषणासाठी बसण्याच्या तयारीत आहेत. याआधी २० फेब्रुवारी रोजी उमेदवार उपोषणाला बसले असता, त्यांना दोन महिन्यांमध्ये सर्व सुरळीत होईल असे आश्वासन देण्यात आले होते. पण मे महिना उजाडला तरी एसटी प्रशासनाकडून कोणतीच हालचाल न झाल्याने हे उमेदवार पुन्हा १५ मे पासून आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
एसटी महामंडळाने २०१९ सरळ सेवा भरती (दुष्काळग्रस्त भागातील मुलांसाठी काढली होती) यामध्ये १२ विभागांची ४ हजार ४१६ जागांची चालत तथा वाहक पदाची जाहिरात निघाली होती. पुणे विभागाने आधी लेखी परीक्षा घेतली, कागदपत्र छाननी झाली, मेडिकल झाले, त्यामधून २ हजार ९८२ मुलांना १७ जानेवारी २०२० पासून भोसरी येथे वाहन चाचणीसाठी बोलवले होते. पण यातील २३०० मुलांची चाचणी झाल्यावर २५ फेब्रुवारी २०२० रोजी भोसरी येथील ट्रॅक बंद पडला व तेव्हापासून हा ट्रॅक बंदच आहे. या भरती मधील मुलांनी सतत यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव यांच्यासह एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागितली पण एसटी महामंडळाने यावर आजपर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही. या पात्र मुलांचे वय निघून जात असल्यामुळे, मुलांचे लग्न होत नसल्यामुळे, पुणे भागातील उमेदवार दुसऱ्यांदा आझाद मैदानावर उपोषणास बसणार आहेत.
पुणे विभागातील राहिलेल्या मुलांच्या ट्रायल तात्काळ घेऊन १ हजार ६४७ जागांची अंतिम निवड यादी जाहीर करावी, राहिलेल्या मुलांच्या ट्रायल पूर्ण करून भरती प्रक्रिया पूर्ण करा, मुलांच्या अंतिम निवड याद्या जाहीर करून तात्काळ प्रशिक्षण सुरू करा, प्रशिक्षण सुरू करताना जास्तीत जास्त गाड्यांची व्यवस्था करावी जेणेकरून मुलांचे तीन वर्ष भरून निघतील, या प्रमुख मागण्या या उमेदवारांच्या आहेत.
काय म्हणतात उमेदवार..
आज या राज्यात समृद्धी महामार्ग एवढा जलद गतीने झाला, महामेट्रोचे काम एवढ्या जलद गतीने होत आहे मग भोसरी येथील जेमतेम १०० मीटर चा ट्रॅक तयार करायला एसटी प्रशासनाला एवढे वेळ का लागत आहे, असा संतप्त सवाल या उमेदवारांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. ट्रायल राहिलेल्या ७४२ आणि ट्रायल झालेल्या २ हजार २४० मुलांच्या भविष्यासोबत हे महामंडळ खेळत आहे. म्हणून आम्ही याआधी २० फेब्रुवारी पासून आझाद मैदान मुंबई येथे उपोषणास बसलो होतो. त्यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांनी आम्हाला आश्वासन दिले होते की, येणाऱ्या १ मेपर्यंत कुठल्याही परिस्थितीत तो ट्रॅक चालू करून तुमची अंतिम निवड यादी जाहीर करण्यात येईल. पण आतापर्यंत हा ट्रॅक दुरुस्त झालेला नाही किंवा मुलांना मेडिकलचे किंवा ट्रायलचे मेसेज आलेले नाहीत. यावरून असे लक्षात येते की एसटी महामंडळ दिलेला शब्दाला जागत नाही. दिलेल्या शब्दाची पूर्तता न झाल्यामुळे आम्ही ३०० उमेदवार परत १५ मे पासून आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषणास बसणार आहोत. आता आमची सहनशक्ती संपलेली आहे. भविष्यात याचा काही उद्रेक झाल्यास किंवा आमच्या जीवितास काही झाले तर याला सर्वस्वी राज्य सरकार, एसटी महामंडळाचे मुंबई आणि पुणे विभाग जबाबदार राहतील, असे सांगितले.