काळवाडी येथे बिबट्याला पकडण्यासाठी लावले ४० पिंजरे, बिबट्या अखेर जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 07:38 PM2024-05-20T19:38:17+5:302024-05-20T19:40:20+5:30
काळवाडी, उंब्रज, पिंपळवंडी, पिंपरी पेंढार परिसरामध्ये वनविभागाने ४० पिंजरे लावले असून गेल्या १० दिवसांमध्ये हा आठवा बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला आहे...
पिंपरी पेंढार (पुणे) : काळवाडी (ता. जुन्नर) परिसरामध्ये वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये चार ते पाच वर्षांची मादी जेरबंद झाल्याची माहिती ओतूरचे वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांनी दिली. हा बिबट्या सोमवारी पहाटे जेरबंद झाला.
काळवाडी, उंब्रज, पिंपळवंडी, पिंपरी पेंढार परिसरामध्ये वनविभागाने ४० पिंजरे लावले असून गेल्या १० दिवसांमध्ये हा आठवा बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला आहे. काळवाडी या ठिकाणी पिंजऱ्यात जेरबंद झालेले बिबट्याची मादी असून तिचे वय सुमारे चार ते पाच वर्षे असावे असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
गेल्या दहा दिवसांपासून वनविभागाने पकडलेले हे आठही बिबटे माणिकडोह निवारा केंद्रात आहेत. यातील एकही बिबट्या सोडून दिलेला नसल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. काळवाडी या ठिकाणी रुद्र फापाळे हा आठ वर्षांचा मुलगा बिबट्याने ठार केल्यानंतर त्या ठिकाणी मोठा आक्रोश निर्माण झाला होता. त्यावेळी पकडलेले बिबटे यापुढे सोडण्यात येऊ नयेत, अशी मागणी नागरिकांची होती. त्यानुसार उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी यापुढे पकडलेले बिबटे सोडून दिले जाणार नाहीत, अशी ग्वाही दिली होती.