आधीच ४० कोटी कर्ज; पुन्हा बँकेच्या बनावट लेटरहेडद्वारे ६० लाखांचे कर्ज घेण्याचा प्रयत्न
By रोशन मोरे | Published: June 25, 2023 06:12 PM2023-06-25T18:12:35+5:302023-06-25T18:13:08+5:30
बोगस लेटरहेड तयार करून त्या लेटरहेडवर खोटा मजकूर छापून त्यावर बँकेचे बनावट शिक्के मारले
पुणे : बँकेकडून तब्बल ४० कोटी कर्ज घेतले. त्यासाठी मालमत्ता गहान ठेवली. मात्र, जी मालमत्ता कर्ज घेतलेल्या बँकेकडे गहान ठेवली होती. तीच मालमत्ता बँकेचे खोटे लेटरहेड तयार करून त्यावर मॅनेजरच्या बनावट सह्या करून दुसऱ्या बँकेकडे सादर करत तब्बल ६० लाख रुपयांच्या कर्ज घेण्याचा प्रयत्न करत फसवणूक केली. तसेच गहान ठेवलेल्या जमीनीचे विकसन करारनामा केला. ही घटना २५ डिसेंबर २०२२ ते २४ जून २०२३ या कालावधीत ॲक्सीस बँक प्राईड हाऊस, सेनापती बापट रोड, चतु:श्रृंगी येथे घडला. या प्रकरणी जनसेवा सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक राजेंद्र रामदास सुपेकर यांनी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दशरथ विठ्ठल शितोळे (रा. कोरेगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या जनसेवा सहकारी बँक, ससाणेनगर हडपसर येथून ४० कोटी रुपये कर्ज घेतले. त्या कर्जासाठी विविध मालमत्ता गहाण ठेवल्या. गहाण ठेवलेल्या मालमत्तेमधील कदमवाक वस्ती येथील ६५ लाख २२ हजार ९८४ रुपये किंमतीची जमीनी बँकेच्या परवानगीशिवाय बेकायदेशीररित्य विकसनासाठी देऊन बँकेची ६५ लाख २२ हजार ९५८ रुपयांची फसवणूक केली. तसेच १५ डिसेंबर २०२२ व २७ डिसेंबर २०२२ या दिवशीचे जनसेवा सहकारी बँकेचे बोगस लेटरहेड तयार करून त्या लेटरहेडवर खोटा मजकूर छापून त्यावर बँकेचे बनावट शिक्के मारले. तसेच मॅनेजरची बनावट सही करून या बनावट लेटरहेडद्वारे सेनापती बापटरोडवरील ॲक्सीस बँकेच्या कर्जविभागातून ६० लाख रुपये कर्ज घेण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद आहे.