श्वसनाच्या आजारात ४० टक्क्यांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:39 AM2020-11-22T09:39:54+5:302020-11-22T09:39:54+5:30
पुणे : देशभरात वाढते प्रदूषण ही बिकट समस्या बनली आहे. वाहनांसह दिवाळीत फोडल्या जाणा-या फटाक्यांमधून निघणा-या धुरामुळे आरोग्याच्या अनेक ...
पुणे : देशभरात वाढते प्रदूषण ही बिकट समस्या बनली आहे. वाहनांसह दिवाळीत फोडल्या जाणा-या फटाक्यांमधून निघणा-या धुरामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारींसह श्वसन यंत्रणेवर थेट परिणाम होतो आहे. सध्या जगभरात कोरोना विषाणूमुळे हाहाकार माजला आहे. गेल्या काही दिवसांत श्वसनाशी संबंधित रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 40 टक्के वाढले असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ञांनी नोंदविले आहे.
दिवाळी काळात फुटणा-या फटाक्यांमुळे हवेत सल्फर डाय आॅक्साईड, कार्बन डाय आॅक्साइड, मोनो आॅक्साइड आणि काही घातक पदार्थ हवेत मोठ्या प्रमाणात पसरतात. त्याचा परिणाम श्वसन यंत्रणा, मेंदू यावर अधिक होतो. विशेषत: लहान मुले तसेच आजारी व्यक्ती, मधुमेह असलेल्या व्यक्ती या मुळे बाधित होतात. फटाक्यामध्ये असणारे अनेक लहान शीशाचे तुकडे हे थेट परिणाम करतात. या प्रदुषणामुळे श्वासोच्छवासाच्या आणि इतर समस्यांमध्ये 40% रुग्णांची वाढ झाली असल्याचे वैद्यकीय तज्ञ डॉ. अरूण सुराडकर यांनी सांगितले. फटाक्यांचे अविरत ज्वलन होण्यामुळे वायू प्रदूषण वाढते आणि दमा तसेच अॅलजीर्ची प्रतिक्रिया उद्भवते. प्रदूषित वातावरणामुळे अल्पावधीत डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह, डोकेदुखीसह श्वास लागणे, झोप येणे, जागरूकता कमी होणे, मळमळ, उलट्या आणि ओटीपोटात वेदना होऊ शकतात, याकडेही सुराडकर यांनी लक्ष वेधले.
सध्या श्वास घेण्यात अडचण, वाहणारे नाक, घसा खवखवणे, छातीत संक्रमण आणि त्रासदायक दमा अशा सामान्य तक्रारी समोर येत आहेत. फुफ्फुस व कर्करोगाचा आजार असलेल्या रूग्णांना सीओपीडी आणि दम्याचा त्रास होऊ शकतो. तीव्र खोकला, वाहते नाक, शिंका येणे, त्वचेची जळजळ असा त्रास देखील होऊ शकतो असे इंटर्नल मेडिसीन कन्सलटंट डॉ. महेश लाखे यांनी सांगितले.
----------------------------------------------
फटाक्यांपेक्षाही वाहनांमधून बाहेर पडणा-या धुराचे प्रमाण अधिक आहे. त्यातून श्वसनाचे अनेक आजार उदभवत आहेत. फुफ्फुस व कर्करोगाचा आजार असलेल्या सीओपीडीच्या रूग्णांचे प्रमाण वाढले असून, त्यात ज्येष्ठांचा अधिकांश समावेश आहे- डॉ. नितीन अभ्यंकर, फुफ्फुस विकार तज्ञ
----------------------------------------------