Pune Crime : केस मागे घेण्याच्या नावाखाली ४० लाखाच्या खंडणीची मागणी
By विवेक भुसे | Published: October 17, 2022 04:03 PM2022-10-17T16:03:11+5:302022-10-17T16:08:37+5:30
कोरेगाव पार्क पोलिसांनी फख्राबादी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल...
पुणे : केस मागे घेण्याच्या नावाखाली ४० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्याला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून कोंढवा परिसरातून अटक केली. फर्जाद मोहम्मद रिझा फख्राबादी (वय ३१, रा. साळुंखे विहार, कोंढवा) असे त्याचे नाव आहे. याबाबत ७२ वर्षाच्या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार कोरेगाव पार्क पोलिसांनी फख्राबादी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलावर २०१८ मध्ये एका महिलेने गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यातील महिला ही आपली मैत्रिण असून, तिला केस मागे घ्यायला सांगतो असे म्हणून फख्राबादी हा फिर्यादींच्या मुलाला ४० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करत होता. दरम्यान फिर्यादी महिलेचा मुलगा दाखल गुन्ह्यात ३ महिने कारागृहात देखील राहून आला होता. फख्राबादी हा वारंवार फिर्यादीच्या मुलाला तो अंजुमन इराणी ग्रुपचा सदस्य असल्याचे सांगून खंडणी मागत होता.
तीन अनोळखी व्यक्ती ६ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी दुचाकीवरुन आल्या. त्यांनी या प्रकरणात ४० लाख रुपयांची खंडणी द्या नाहीतर तुम्हाला पाहून घेतो अशी फिर्यादींच्या मुलाला धमकी दिली होती. हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादी महिलेने पोलिस आयुक्तांकडे तक्रार अर्ज केला होता. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विशाल मोहिते, कर्मचारी गजानन सोनुने, संजय जाधव, उज्वल मोकाशी, समीर पटेल यांच्या पथकाने संशयित आरोपीचा शोध सुरू केला होता.
केवळ तो एका ग्रुपचा सदस्य असल्याचीच पोलिसांकडे माहिती होती. मात्र बातमीदार व तांत्रिक विश्लेषनाद्वारे तपास करून पथकाने फख्राबादीला कोंढवा परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत तो फिर्यादींच्या मुलाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याचा फायदा घेऊन त्यांच्याकडे खंडणी मागत असल्याची कबुली त्याने दिली. तसेच तो ज्या महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे खंडणी मागत होता, ती महिला देखील सध्या पुण्यात नसल्याचे समोर आले. अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, सहायक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.