पुणे पोलिसांची ४० टक्के वाहने आहेत निकामी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 11:42 AM2019-10-07T11:42:51+5:302019-10-07T11:52:30+5:30

दुरुस्ती-देखभालीचा वाढतो खर्च : नव्याने येणार १३० गाड्या

40 percent police vehicles are in the out of use condition | पुणे पोलिसांची ४० टक्के वाहने आहेत निकामी

पुणे पोलिसांची ४० टक्के वाहने आहेत निकामी

googlenewsNext
ठळक मुद्देपुणे पोलीस दलाकडे सध्या ५२१ दुचाकी; ३९३ चारचाकी गाड्या ३९३ चारचाकी गाड्यावाहने निकामी काढण्याचे निकष बदलणार

विवेक भुसे- 
पुणे : विधानसभा निवडणुकीची धांदल सुरू झाली आहे़. उमेदवारांच्या पदयात्रा, स्टार प्रचारकांचे दौरे, पंतप्रधानांपासून महत्त्वांच्या नेत्यांच्या सभा आता सुरू होत आहे़. या सर्व ठिकाणी बंदोबस्त ठेवणे, गस्त घालणे यासाठी पोलिसांना मोठ्या प्रमाणावर वाहनांची गरज असते; पण सध्या पोलिसांकडे असलेल्या वाहनांपैकी ४० टक्के वाहने शासकीय निकषानुसार निकामी झाली आहेत़. अशा अवस्थेत ही वाहने वापरली जात आहे़. राज्यात जवळपास सर्व पोलीस आयुक्तालय व जिल्हा पोलीस दलाकडील उपलब्ध पोलीस वाहनांची अवस्था अशीच आहे़. 
शासनाच्या निकषानुसार शासकीय वाहनांची कालमर्यादा १० वर्षे किंवा २ लाख ४० हजार किमी अशी ठरविण्यात आली आहे़. असे असताना पुणे आयुक्तालयातील मोटार वाहन विभागात ४ लाख किमी धाव झालेली वाहनेही अजून वापरात आहेत़. 
पुणे पोलीस दलाला नुकत्याच अत्याधुनिक ६० दुचाकी स्मार्ट सिटी कडून देण्यात आल्या़. तसेच काही दिवसांपूर्वी खासगी संस्थेने १०० वाहने दिली होती़. पुणे पोलीस दलाकडे सध्या ५२१ दुचाकी वाहने असून, त्यापैकी २४४ दुचाकी वाहनांची कालमर्यादा ओलांडलेली आहे़. त्यामुळे या वाहनांच्या दुरुस्तीचा खर्च वाढू लागला आहे; तसेच ३९३ चारचाकी गाड्या आहेत़. त्यात प्रामुख्याने सुमो, बोलेरो जीप १५० आहेत़ त्यापैकी ८० सुमो गाड्यांनी आपली कालमर्यादा पूर्ण केली आहे़, तरीही त्या वापरात आहेत़. चारचाकींपैकी १५२ चारचाकी वाहनांनी १० वर्षे आपली सेवा पूर्ण केली आहे़. त्यातील १०० अद्याप चालू आहेत़. 
पोलीस उपायुक्त आणि त्यावरील वरिष्ठ अधिकाºयांसाठी २५ कार आहेत़ त्यापैकी ९ कार निकामी झाल्या आहेत़. फॉर्च्युनर, सफारी गाड्या पोलीस दलाकडे आहेत़. त्याचा वापर अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी केला जातो़.
पुण्यातील सर्व पोलीस ठाण्यांना आरोपींच्या ने-आण करण्यासाठी ३० गाड्या देण्यात आल्या आहेत़. याशिवाय एक्सकॉर्टसाठी ९ गाड्या ठेवलेल्या असतात़. 
अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी पोलीस दलाकडे बुलेटप्रुफ गाड्या मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नाशिक येथे देण्यात आल्या आहेत़ या सर्व गाड्यांची देखभाल, दुरुस्ती आणि संचालन थेट मुंबईहून एसआयडीकडून करण्यात येते़. 
.........
पोलिसांकडील वाहनांच्या दुरुस्ती-देखभालीसाठी प्रत्येक पोलीस आयुक्तालयात मोटार वाहन विभाग असतो़. त्यांच्याकडून या गाड्यांची नियमित पाहणी होते़. कालमर्यादा पूर्ण केलेल्या वाहनांची संख्या वाढली की, त्याच्या दुरुस्तीचा खर्च वाढतो व त्यांची देखभाल सातत्याने करावी लागते़. 
तसेच, रात्री-अपरात्री गस्त घालत असताना गुन्हेगारांकडे अत्याधुनिक वाहने असताना त्यांचा अशा वाहनांतून पाठलाग करणे अपघाताची शक्यता वाढविणारा ठरत आहे़. 
राज्याच्या मोटार वाहन विभागामार्फत लवकरच १३० नव्या गाड्या येणार आहेत़. त्याचे राज्यातील सर्व प्रमुख घटकांकडून असलेल्या मागणीनुसार त्यांचे वितरण करण्यात येणार आहे़. 
........
वाहने निकामी काढण्याचे निकष बदलणार
शहर; तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांमध्ये आता सुधारणा झाली आहे़. त्यामुळे सध्या असलेली या वाहनांची वयोमर्यादा वाढविण्याचा विचार सुरू आहे़. त्याबाबतच्या प्रस्तावावर सध्या चर्चा सुरू आहे़. येत्या मार्चपर्यंत या वाहनांबाबतचे नवे निकष प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे़ - विजय पाटील, पोलीस अधीक्षक (मुख्यालय), महामार्ग सुरक्षा पथक

Web Title: 40 percent police vehicles are in the out of use condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.