यंदाच्या मोसमात खडकवासला धरणातून क्षमतेच्या वीसपट पाण्याचा विसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 06:09 PM2019-09-09T18:09:11+5:302019-09-09T18:15:02+5:30
यंदाच्या मोसमात खडकवासला धरणातून क्षमतेच्या वीसपट पाणी सोडण्यात आले.
पुणे : खडकवासला धरणसाखळीत झालेल्या जोरदार पावसामुळे मुठा नदी अनेकदा दुथडी वाहिली आहे. नदीकाठच्या वसाहती, सोसायट्या आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये देखील पाणी गेले आहे. यंदाच्या मोसमात खडकवासला धरणातून क्षमतेच्या वीसपट म्हणजेच सुमारे ४० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
खडकवासला धरणसाखळीत टेमघर, वरसगाव, पानशेत ही धरणे येतात. वरसगाव धरणाची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १२.८२, पानशेत १०.६५ आणि टेमधरची ३.७१ टीएमसी आहे. तर, खडकवासल्याची उपयुक्त पाण्याची क्षमता १.९७ टीएमसी आहे. या चारही धरणांची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता २९.१५ टीएमसी आहे. त्यातील १७ ते १८ टीएमसी पाणी पुणे शहर आणि लगतच्या भागाला पिण्यासाठी लागते. तर, उर्वरीत पाणी सिंचन आणि उद्योगाला वापरतात.
यंदा जुलैच्या शेवटच्या आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झाला. धरणातून अनेकदा पाणी सोडावे लागले. त्यामुळे मुठा नदी देखील बऱ्याचदा दुथडी भरुन वाहिली. धरणातील विसर्ग ४५,४७४ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला होता. धरणसाखळीत पावसाचा जोर असल्याने ४ ते ८ गस्ट दरम्यान २२.३४ टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले होते. गेले आठवडाभर धरणक्षेत्रात पुन्हा पावसाने काहीसा जोर धरला आहे. जमिनीत चांगला ओलावा असल्याने धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा होत आहे. परिणामी धरणातून सातत्याने पाणी सोडण्यात येत आहे.
सोमवारी सकाळी आठ पर्यंतच्या चोवीस तासांत टेमघरला ६०, वरसगाव ३८, पानशेत ३९ आणि खडकवासला धरणपाणलोट क्षेत्रात ८ मिलिमीटर पाऊस झाला. सध्या टेमधरमधे ३.६१ टीएमसी (९७.३० टक्के) पाणीसाठा असून, इतर तीनही धरणे शंभर टक्के भरली आहेत. सोमवारी वरसगाव धरणातून १७७६, पानशेत धरणातून ९९० क्युसेक पाणी खडकवासल्यात सोडण्यात आले. त्यामुळे पुढे खडकवासला धरणातून १३,९८१ क्युसेकने पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. तर, मुठा उजव्या कालव्यातून १ हजार ५४ क्युसेक पाणी सोडण्यात आले.