पुणे : वरातीतल्या भांडणातून ४० वर्षीय युवकाचा खून करून मृतदेह फेकला चासकमान कालव्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 11:17 AM2022-05-25T11:17:51+5:302022-05-25T11:28:35+5:30
मृतदेह एका वाहनात घालून चासकमान धरणाच्या डाव्या पाण्यात फेकून दिला...
राजगुरुनगर (पुणे) : लग्नाच्या वरातीत दारू पिऊन भांडणे केल्याच्या वादातून कडधे ( ता. खेड ) येथे खून झाल्याची घटना घडली आहे. शंकर शांताराम नाईकडे (वय ४०, रा. कडधे, ता. खेड ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
कडधे गावात मंगळवारी (दि. २४ ) एका लग्नाची वरात रात्री सुरू होती. त्यात शंकर नाईकडे आला व त्याने काही युवकांकडे प्यायला दारूची मागणी केली. नंतर नाचणाऱ्या काही युवकांमध्ये घुसून धक्काबुक्की करू लागला. त्यावर बाचाबाची, भांडणे झाली. सहा युवकांनी एकत्रितपणे त्याला बाजूला नेले. अंधारात त्याच्यावर चहुबाजूंनी जोरदार हल्ला चढवला. दगड, विटांनी डोक्यावर मारहाण केली. त्याचा मुत्यूदेह एका वाहनात घालून चासकमान धरणाच्या डाव्या पाण्यात फेकून दिला. अशी माहिती खेडचे पोलीस निरीक्षक सतिश गुरव यांनी दिली.
याबाबत वासुदेव बोंबले, पवन बोंबले दोघेही (रा. वेताळे, ता खेड व स्वप्नील सावंत, निलेश नाईकडे, ऋषिकेश उर्फ लखन नाईकडे, विलास परसुडे सर्व ( रा कडधे,ता खेड ) यांच्या विरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेबाबत मयताच्या पत्नी सुषमा शंकर नाईकडे यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे .