चाळीस वर्षीय आईने दिले मुुलाला जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 06:04 PM2018-05-03T18:04:26+5:302018-05-03T18:04:26+5:30
दोन मुत्रपिंडांपैकी एक मुत्रपिंड निश्चित जागेवर (एक्टोपिक) नाही. तर दुसरे मुत्रपिंड निकामी झाले होते. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे मुत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते.
पुणे : बावीस वर्षीय मुलाच्या दोन्ही मुत्रपिंड निकामी...डॉक्टरांनी मुत्रपिंड प्रत्योरोपणाचा सल्ला..पण आर्थिक परिस्थिती बेताची...मग चाळीस वर्षीय आईनेच मुलाला वाचविण्यासाठी स्वत:चे मुत्रपिंड देण्याचा निर्णय घेतला. ससून रुग्णालयाने यामध्ये पुढाकार घेत कोणत्याही खर्चाशिवाय गुरूवारी ( दि. ३ मे ) प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया केली. आईने दिलेल्या मुत्रपिंडामुळे मुलाला जीवनदान मिळाले.
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील माबोरगाव या गावात राजेश पुरी पत्नी व दोन मुलांसह राहतात. हे कुटूंब दारिद्रयरेषेखालील आहे. राजेश पुरी हे मजूर तर पत्नी एकता पुरी या गृहिणी आहेत. बावीस वर्षीय मुलगा शुभम हा वाणिज्य पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. शुभमला ७ वर्षांपासून मुत्रपिंड विकाराचा त्रास होत होता. शुभमच्या दोन मुत्रपिंडांपैकी एक मुत्रपिंड निश्चित जागेवर (एक्टोपिक) नाही. तर दुसरे मुत्रपिंड निकामी झाले होते. त्यामुळे शुभमने चार वेळा नांदेडला डायलिसिस केले होते.
किनवट महाआरोग्य शिबिरात शुभमच्या मुत्रपिंड विकाराचे निदान झाले होते. या शिबिरातील डॉक्टरांनी त्यास मुत्रपिंड प्रत्यारोपणाचा सल्ला दिला होता. परंतु प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे त्याला मुत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. खाजगी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाचा खर्च गरीब रुग्णाच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे त्याच्यावर ससून रुग्णालयात प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. कुटूंबाबाहेरील व्यक्तीचे मुत्रपिंड मिळण्यासाठी अनेक अडचणी येतात. त्यामुळे शुभमच्या चाळीस वर्षीय आईनेच धाडसी निर्णय घेत मुलाचा जीव वाचविण्यासाठी स्वत:चे मुत्रपिंड देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरूवारी ससूनमध्ये ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. महात्मा फुले जीवनादायी योजनेसह काही संस्था व व्यक्तींनी दिलेल्या निधीतून ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे या कुटूंबावर शस्त्रक्रियेचा आर्थिक भार पडला नाही.
रुग्णालयात मुत्रपिंड प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध झाल्यानंतरची ही एकुण पाचवी तर जिवंत व्यक्तीकडून मुत्रपिंड दान केल्यानंतरची दुसरी शस्त्रक्रिया आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. अभय सदरे, डॉ. निरंजन आंबेकर, डॉ. सचिन भुजबळ, डॉ. अमित भंगाळे, डॉ. हरीश टाटिया, भूलतज्ज्ञ डॉ. माया जामकर, डॉ. योगेश गवळी, अर्जुन राठोड, परिचारिका सय्यद यांनी ही शस्त्रक्रिया केली.
----------
किनवटहुन एवढ्या दूर अंतरावरून हे कुटूंब ससून रुग्णालयात मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी विश्वासाने आले. ससून रुग्णालयाचा प्रवास सेवाभावी संस्था व अत्याधुनिकतेमुळे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी होण्यापर्यंत झाला आहे. सर्वसुविधांनी युक्त ससून गोरगरीब तसेच मध्यमवर्गीय रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.
- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून रुग्णालय