शिरूरसाठी ४०० क्युसेक्सने पाणी सोडले
By admin | Published: July 24, 2016 05:29 AM2016-07-24T05:29:45+5:302016-07-24T05:29:45+5:30
शिरूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे चासकमान धरणाच्या जलाशयातून डाव्या कालव्यास शनिवारी (दि. २३) सकाळी १० वाजता ४०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.
चासकमान : शिरूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे चासकमान धरणाच्या जलाशयातून डाव्या कालव्यास शनिवारी (दि. २३) सकाळी १० वाजता ४०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. धरणात ६४.३० टक्के पाणीसाठा झाला आहे.
शिरूर तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे येथे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरींची पाणीपातळी खालावल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांनी चासकमान धरणातून डाव्या कालव्यास पाणी सोडण्याची मागणी केली होती. पालकमंत्री गिरीश बापट, शिरूर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे, खेडचे आमदार सुरेश गोरे व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची बैठक होऊन पाणी सोडण्याचा निर्णय होऊन चासकमान धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. हे आवर्तन ४५ दिवस ‘टेल टु हेड’ चालू राहणार आहे, अशी माहिती सहायक अभियंता एस. जी. शहापुरे, तसेच शाखा अभियंता एस. एन. भुजबळ यांनी दिली.