पुण्यातील वाहतूक कोंडीवर ४०० किलोमीटरच्या रस्त्याचा मुलामा

By नितीन चौधरी | Published: October 17, 2022 06:12 PM2022-10-17T18:12:22+5:302022-10-17T18:13:04+5:30

नवे उड्डाण पूल, भुयारी मार्ग करणार....

400 KM road coating on Pune's traffic jam chandrakant patil pune city latest news | पुण्यातील वाहतूक कोंडीवर ४०० किलोमीटरच्या रस्त्याचा मुलामा

पुण्यातील वाहतूक कोंडीवर ४०० किलोमीटरच्या रस्त्याचा मुलामा

Next

पुणे : “पुणे शहरातील वाहतूक कोंडी व रस्त्यांची दुर्दशा दूर करण्यासाठी ४०० किलोमीटरचे रस्ते नव्याने दुरुस्त करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांनी ठेवला आहे. त्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून पाऊस संपल्यानंतर या कामाला सुरुवात केली जाईल. ज्या ठिकाणी रस्ते दुरुस्त करून चालणार आहे तेथे दुरुस्ती आणि जेथे नव्याने रस्ते करावे लागणार आहेत, तेथे नवे रस्ते केले जाणार आहेत. त्यातून वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न असेल,” अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

पाटील यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आमदार राहुल कुल आदी उपस्थित होते. ते म्हणाले, “यंदा पावसामुळे शहरातील रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली आहे. त्यामुळे सर्वत्र वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यांची तात्पुरती डागडुजी केल्यानंतर पावसामुळे ते काम पु्न्हा खराब होत आहे. त्यामुळे पाऊस थांबू द्या त्यानंतरच रस्त्यांची नीट कामे करा अशा सूचना दिल्या आहेत. महापालिका आयुक्त विक्रमकुमार व पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी एका आराखडा सुचवला आहे. त्यात शहरातील ४०० किलोमीटरच्या रस्त्यांची नव्याने दुरुस्ती करण्यात येणार आहे. केवळ दुरुस्तीच नव्हे तर डांबराचा नवीन थर टाकून ते तयार करण्यात येतील. यामध्ये जास्त वाहतूक असलेल्या रस्त्यांचा समावेश करण्यात येईल.”

दिवाळीत चलन फाडणार नाहीत -

पुणे शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सीएसआर निधीमधून सहाशे ट्रॅफिक कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक चौकात एक दोन कर्मचारी वाहतूक नियमन करतील. दिवाळीत नियम तोडणाऱ्या वाहनचालकांना देण्यात येणाऱ्या चलनांमुळे रस्त्यातच कोंडी होते. ती टाळण्यासाठी दिवाळीच्या काळात वाहतूक पोलिस कोणतेही चलन फाडणार नाहीत असे निर्देशही त्यांनी या वेळी दिले. मेट्रोच्या कामांमुळे खराब झालेले रस्ते पुन्हा दुरुस्त करण्यात येतील. त्यासाठी मेट्रो किंवा महापालिका ते दुरुस्त करतील. एकमेंकावर चालढकल न करता महापालिकेने हे दुरुस्त केल्यास त्याचा खर्च महामेट्रोकडून वसूल करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

नवे उड्डाण पूल, भुयारी मार्ग करणार

तसेच एल अँड टी कंपनीने वाहतूक कोंडी दूर करण्याची एक योजना सुचविली आहे. त्यात काही ठिकाणी उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग सुचविले आहेत. रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर दोन तीन महिन्यांत त्याचा आराखडा अंतिम करून राज्य सरकारकडे निधी मागण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. शहरातील नाल्यांच्या दुरुस्तीची कामेही करण्यात येणार असून त्यात खोलीकरण, रुंदीकरण व भिंत बांधण्याचे काम करण्यात येईल. याबाबत महापालिका एक आराखडा तयार करून त्यासाठी राज्य सरकारकडे निधीची मागणी करण्यात येईल. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सुप्रिया सुळे यांची टीका
पुण्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे रस्त्यांच्या दुर्दशेची लक्तरे वेशीवर टांगली गेली. याला महापालिकेतील पाच वर्षे सत्तेत असलेले २४ बाय ७ वाले सत्ताधारीच जबाबदार आहेत, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. स्मार्ट पुणे हा उपक्रमच नापास झाला आहे. स्मार्ट सिटीसाठी देशभरात ५० हजार कोटी तर अमृत सिटीसाठी आणखी ५० हजार कोटी असा एक लाख कोटी खर्च झाला आहे. त्याचा खरेच किती फायदा झाला याचे कुणी ऑडिट केले आहे का, असा सवालही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

आजच्या बैठकीत त्यांनी मेट्रोची को नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करू असे सांगितले. मेट्रोची निम्मी कामे अजून सुरूही झालेली नाहीत. तर ती एका महिन्यात पूर्ण कशी होतील असेही त्या म्हणाल्या. पुण्यात होणाऱ्या विकासकामांचे कोणतेही नियोजन नसून त्यातून उद्भवणाऱ्या समस्यांमुळे सामान्य पुणेकरांचे हाल होत आहेत.

Web Title: 400 KM road coating on Pune's traffic jam chandrakant patil pune city latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.