पुणे महापालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागात ४०० कार्यालयीन सहाय्यकांची होणार नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 07:40 PM2020-08-18T19:40:57+5:302020-08-18T19:42:39+5:30
सहा महिन्यांकरिता केली व २०० ऐवजी ४०० जणांची कार्यालयीन सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय
पुणे : महापालिकेचा मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत असलेल्या कर आकारणी व कर संकलन विभागात मनुष्यबळाची कमतरता पडू नये व अधिकाधिक मिळकत कर जमा होण्यास मदत व्हावी. या उद्देशाने या विभागात सहा महिन्यांकरिता (सप्टेंबर,२०२० पासून) ४०० जणांची कार्यालयीन सहाय्यक म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे.
पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून २०० सेवकांची एकवट वेतनावर तीन महिने मुदतीकरिता नेमणुका करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्याअनुषंगाने कर आकारणी व कर संकलन विभागासाठी अनुभवी लिपिक टंकलेखक संवर्गात २०० जणांची कार्यालयीन सहाय्यक म्हणून तीन महिन्याकरिता नियुक्ती करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे सादर करण्यात आला होता. परंतु, प्रशासनाच्या या प्रस्तावास स्थायी समितीने उपसूचना देऊन ही मुदत सहा महिन्यांकरिता केली व २०० ऐवजी ४०० जणांची कार्यालयीन सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार प्रत्येक नियुक्त उमेदवारांना किमान वेतन कायद्यानुसार, दरमहा साधारणत: एकवट मानधन म्हणून १९ हजार २५० रूपये वेतन दिले जाणार आहे. या नव्या २०० नियुक्तीमुळे पालिकेच्या तिजोरीवर दरमहा ३८ लाख ५० हजार रूपये अतिरिक्त बोजा येणार होता. तो स्थायी समितीच्या उपसूचनेनुसार कार्यवाही अंती आता दुप्पटीवर जाणार आहे. सदर खर्च कर आकारणी व कर संकलन विभागाकडील अर्थ शिर्षकावर खर्ची करण्यात येणार आहे.
---------------------
बालेवाडी बाणेर येथील कोविड हॉस्पिटल
बालेवाडी येथील सर्व्हे नं.२०, २१ व बाणेर येथील सर्व्हे नं.१०९ या मिळकतीमध्ये अकोमोडेशन रिझर्वेशनच्या माध्यमातून सुमारे ४२०० चौ़मी़ क्षेत्रफळाचे तळ मजला व ६ मजले इमारत ताब्यात येत आहे. त्यानुसार पालिकेने येथे सी.एस.आर.च्या माध्यमातून पंचशील फाऊंडेशनच्यावतीने कोविड केअर हॉस्पिटल उभारण्याचे नियोजन केले आहे.
सदर हॉस्पिटलमध्ये प्रारंभी १०० बेड कार्यान्वित करण्यात येत असून, येथील ऑक्सिजन बेड, आयसीयू बेडसह केटरींग सर्व्हिसेस, फार्मसी सर्व्हिसेस आदी कामे व मेडिकल व पॅरामेडिकल स्टाफ पुरविण्याचे काम भाकरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांना कोविड-१९ आजाराचा प्रादुर्भाव असेपर्यंत देण्यास आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.