४०० रुपयांचा ड्रेस पडला एक लाखाला; ओटीपी शेअर न करताही ऑनलाइन फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 04:24 PM2020-03-04T16:24:18+5:302020-03-04T16:25:03+5:30
ड्रेस पसंत न पडल्याने त्यांनी ड्रेस रिटर्न करण्याची रिक्वेस्ट पाठविली होती.
पुणे : शॉपिंग मॉल या वेबसाइटवर ४०० रुपयांचा ड्रेस मागविला. परंतु, ड्रेस पसंत न पडल्याने तो परत करताना त्यांना आलेला मेसेज या तरुणीने फॉरवर्ड केला. मात्र, संबंधिताने ओटीपी मागितला असता या तरुणीने तो शेअर केला नाही. तरीही त्यांच्या बँक खात्यातून १ लाख ५ हजार रुपये ऑनलाईन काढून घेऊन फसवणुक केली.
याप्रकरणी विश्रांतवाडी येथील एका २२ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. त्या मेट्रो पुणे येथे कामाला आहेत. त्यांनी शॉपिंग मॉल या वेबसाईटवर १३ ऑक्टोबर २०१९ रोजी ड्रेस पाहिला होता. त्यांनी तो ऑनलाईन खरेदी केला. त्यांना तो कुरिअरने मिळाला. मात्र, तो ड्रेस पसंत न पडल्याने त्यांनी ड्रेस रिटर्न करण्याची रिक्वेस्ट पाठविली होती. त्यानुसार १७ ऑक्टोबरला एक कर्मचारी त्यांच्या घरी आला. परंतु, त्या घरी नव्हत्या. त्यानंतर १८ ऑक्टोबरला त्यांना एक फोन आला व त्याने ड्रेस रिटर्न करायचा आहे का, अशी चौकशी केली. ड्रेस कोड विचारला. त्यानंतर त्याने तुम्हाला एक मेसेज येईल तो या नंबरवर फॉरवर्ड करा. त्यानुसार त्यांनी आलेला मेसेज फॉरवर्ड केला. त्यानंतर त्याने पुन्हा फोन करुन मोबाईलवर आलेला ओटीपी देण्यास सांगितले. परंतु, त्यांनी तो दिला नाही. त्यानंतर त्यांनी रात्री बँक खाते तपासले तर त्यांच्या खात्यातून १ लाख ५ हजार रुपये ऑनलाईन काढण्यात आल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांना त्या नंबरवरुन वारंवार फोन आला व एटीएम डिटेल्स द्या ८० टक्के पैसे परत करतो, असे सांगितले. मात्र, त्यांनी काहीही माहिती न देता, तो नंबर ब्लॉक केला. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती. सायबर पोलिसांनी अधिक तपासासाठी हा गुन्हा विश्रांतवाडी पोलिसांकडे वर्ग केला आहे.