पुणे-नगर रस्त्यावरील कोंढापुरीत ट्रकचालकाचे लुटले ४० हजार रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:18 PM2017-12-15T12:18:47+5:302017-12-15T12:20:41+5:30
पोलीस असल्याचा बनवा करत पुणे-नगर रोडवर दोघांनी एका ट्रकचालकाचे सुमारे चाळीस हजार रुपयांना लुटल्याचा प्रकार समोर आला आहे.
शिक्रापूर : पोलीस असल्याचा बनवा करत पुणे-नगर रोडवर दोघांनी एका ट्रकचालकाचे सुमारे चाळीस हजार रुपयांना लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. कोंढापुरी (ता. शिरूर) येथे हा प्रकार घडला. या बाबत संजय येसूनारायण तिवारी (वय २५, पहाडी ढेरा, ता. म्हुगंज, जि. रेवा, मध्यप्रदेश) यांनी शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय तिवारी हे त्यांचा ट्रक (एमपी १७ एच एच ३६०२) घेऊन रविवारी (दि. १०) नगरकडे जात असताना कोढापूरी येथे एका पेट्रोलपंपाजवळ थांबले होते. यावेळी पाठीमागून दोन युवक एका दुचाकीवरून आले. तुझ्या वाहनात दारू, गांजा आहे, असे आम्हाला समजले. ट्रकची तपासणी करायची आहे असे म्हणत ट्रकमध्ये घुसले. ट्रक मध्ये काहीही मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी ट्रकचालकाजवळ असलेली पिशवी तपासली. त्यात असलेले चाळीस हजार रुपये काढून घेत या नोटा बनावट असून तपासणी करायची आहे, असे सांगत पैसे घेऊन पळून गेले. दरम्यान अधिक तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दतात्रय होले हे करत आहेत.